शेळ-मेळावलीच्या आंदोलकांवरील खटले मागे घेणे व इंट्रानेट सुवीधा कार्यांवित करणे सत्तरीच्या हुशार युवतीसाठी खरे बक्षिस ठरेल : दिगंबर कामत

0
230
गोवा खबर :आयआयटी आंदोलनात अग्रभागी राहीलेल्या सत्तरी तालुक्यातील शुर व हुशार पुजा मेळेकर हिने गोवा विद्यापीठात ॲनालिटीकल केमिस्ट्री विषयात सर्वाधिक गुण मिळवून संपुर्ण गोव्यात मान मिळवीला आहे. गोमंतकाची अस्मिता जपण्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या या युवतीचे अभिनंदन करतानाच, मुख्यमंत्र्यांनी आयआयटी आंदोलनाच्यावेळी तिच्यावर तसेच इतरांवर दाखल केलेले खटले त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

सरकारने खटले मागे घेणे गरजेचे असुन, सदर कृतीने पुजा मेळेकरला तिच्या कामगिरीबद्दलचे योग्य बक्षिस ठरणार आहे. त्याच बरोबर गोव्याचे पर्यावरण, निसर्ग, वनराई  व अस्मिता जपण्यासाठी लढणाऱ्यांसाठी सदर निर्णयाने सकारात्मकता व प्रोत्साहन मिळेल. आपल्या गावची सुपीक जमिन वाचविण्यासाठीच पुजा मेळेकर व इतरांनी सदर आंदोलन उभारले होते. मायभूमीसाठी लढताना पुजाने अभ्यासावरील लक्ष ढळू दिले नाही हे अत्यंत महत्वाचे आहे असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
यंदाचे शैक्षणिक वर्ष काल पासुन सूरु झाले असतानाच राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत आहेत. गेल्या वर्षी पासुन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी कॉंग्रेस सरकारच्या काळात गोव्याला भेट दिलेली इंट्रानेट सेवा कार्यांवित करण्याची मागणी मी सरकारकडे करीत आहे. सर्व पंचायतींच्या दारात पोचलेली सदर ऑप्टिक फायबर केबल सेवा कार्यांवित केल्यानेच विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे.
सरकारकडे सातत्याने मागणी करुनही त्याची दखल न घेतल्याने आता विद्यार्थ्यांना व पालकांना नाहक त्रास व कष्ट सोसावे लागत आहेत अशी टीका दिगंबर कामत यांनी केली.
कोविड महामारी नंतर शैक्षणिक अभ्यासक्रमावर मोठा परिणाम झाला. सरकारने सर्व जाणकार व तज्ञांची मदत घेवुन शैक्षणिक कृती आराखडा तयार करावा अशी मागणी मी अनेकदा मुख्यमंत्र्यांकडे केली. परंतु, सरकारने त्याची नोंद न घेता विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे खेळ मांडला असे दिगंबर कामत म्हणाले.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या एनएसयुआय अध्यक्ष व इतरांना अटक करण्याच्या कृतीचा मी निषेध करतो. आज एनएसयुआयने केलेल्या आंदोलनामुळेच अनेक परीक्षा रद्द करुन त्या ऑनलायन घेणे सरकारला भाग पडले असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.