शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याविषयीचा अहवाल आयसीएआरकडून राज्य सरकारला सादर

0
567

गोवा खबर:भारतीय कृषी संशोधन संस्थेने शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याविषयीचा अहवाल राज्य सरकारडे सादर केला आहे. संस्थेचे संचालक डॉ ई.बी. चाकूरकर यांनी आज पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.

डॉ चाकूरकर म्हणाले की, राज्य सरकारकडे सादर केलेल्या अहवालात पीक उत्पादकतेत सुधारणा, एकात्मिक कृषी व्यवस्थापन तथा बहुपीकपद्धती, यांत्रिकीकरण, बाजारपेठेची साखळी यावर भर दिला आहे. केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध संस्थांच्या एकत्रित प्रयत्नाने हे शक्य आहे. शेतकऱ्यांना आधुनिक उपकरणांचे प्रशिक्षण देण्यात यावे, असे अहवालात सांगितले आहे.

भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये निरंतर संशोधन कार्य सुरु असते. नुकतेच संस्थेने भाताचे गोवा धन-1, गोवा धन-2, गोवा धन-3, गोवा धन-4 असे चार नवे वाण विकसित केले आहेत. तसेच गेल्या तीन वर्षांत काजूचे तीन नवीन वाण विकसित केले आहेत आणि गोवा तांबडी भाजी-1 या नावाने तांबड्या भाजीचेही वाण विकसित केले आहे, अशी माहिती डॉ चाकूरकर यांनी दिली. याच कार्यक्रमात हरियाणातून हळदीचे उत्पादन आणि प्रक्रिया या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेत प्रथमच हळदीवर प्रक्रीया करण्यासाठीचे तंत्र उपलब्ध झाले आहे.

निर्यातक्षम मानकुरादसाठी प्रयत्न सुरु

राज्यात मानकुराद आंबा प्रसिद्ध आहे. मात्र, त्याची चव आणि गुणवत्ता वेगवेगळी असल्यामुळे तसेच त्याची टिकाऊ क्षमता कमी असल्यामुळे निर्यात होऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन संस्थेत मानकुराद निर्यातक्षम आणि टिकाऊ बनण्यासाठी संशोधन सुरु आहे, लवकरच याचे निकाल हाती येतील, असे डॉ ए आर देसाई यांनी सांगितले.