शिवसेना खाण अवलंबीतांना न्याय मिळवून देणार: नाईक

0
652
गोवा खबर: शिवसेनेबद्दल लोकांना आशा वाटते. जनसामान्यांची काळजी असणारा आणि संसदेत त्यांचा आवाज असणारा हाच पक्ष असल्याची त्यांची भावना आहे, असे प्रतिपादन दक्षिण गोवा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार राखी प्रभुदेसाई नाईक यांनी येथे प्रचार करताना केले.
 सध्या बंद पडलेल्या खाण उद्योगातील अनेक कुटुंबे कुडचडे भागातील आहेत.त्यांना दिलासा देण्यासाठी आपल्या प्रचार मोहिमेत नाईक यांनी कुडचडे बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांची भेट घेतली. खाण उद्योग थंडावल्यामुळे आपल्या व्यवसायात मंदी आली असल्याची तक्रार त्यांनी नाईक यांच्याकडे केली.
 आपल्या जाहीरनाम्यात खाणींच्या समस्येचा खास उल्लेख असून उद्योग पूर्ववत सुरू होईपर्यंत खाण अवलंबितांना किमान आर्थिक आधार देण्याचे आश्वासनही दिले असल्याचे स्मरण राखी नाईक यांनी याप्रसंगी स्थानिकांना करून दिले. त्या म्हणाल्या, खाण अवलंबितांच्या संकटकाळात त्यांच्या पाठीशी उभे न राहणाऱ्या भाजप, काँग्रेस आणि आप पक्षांच्या उमेदवारांसाठी लोकांनी आपली दारे बंद केली आहेत.
  ‘गोवा मायनिंग पीपल्स फ्रंट’ने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या निषेधाच्या आंदोलनात शिवसेनेचे नेते सहभागी झाले होते, असे सांगून त्या म्हणाल्या, लोकांना आता बदल हवा आहे. लोकांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेणारा व त्या कमी करणारा नवा तरुण चेहरा त्यांना हवा आहे. सध्याची परिस्थिती बघितली तर शिवसेनेचा विजय निश्चित आहे.