शिवरायांच्या पुतळ्याला अनुसरून हिंदूंनी राजकारणाला बळी न पडता संघटित होणे काळाची गरज ! – गोविंद चोडणकर

0
709
गोवाखबर: येथील शिवरायांच्या पुतळ्याला अनुसरून राजकर्ते एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत. सत्तरीतील हिंदूंनी या राजकारणाला बळी न पडता संघटित होणे, ही काळाची गरज आहे. हिंदू संघटित झाले, तरच विरोधकांवर वचक बसू शकतो, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे गोविंद चोडणकर यांनी हिंदु धर्मजागृती सभेत केले. हिंदु जनजागृती समितीने श्री सातेरी शांतादुर्गा देवस्थान, धावे, सत्तरी येथे प्रजासत्ताकदिनी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीच्या सौ. ज्योती ढवळीकर यांची उपस्थिती होती.
 गोविंद चोडणकर पुढे म्हणाले, ‘‘पेडणे येथे स्थानिकांचा विरोध डावलून कार्निव्हलचे आयोजन करण्यावर राजकारणी अडून बसले आहेत. कार्निव्हल ही आपली संस्कृती आहे का ? कार्निव्हलमध्ये युवती तोकडे कपडे परिधान करून नाच करतात आणि अशा ठिकाणी पोलीस प्रशासन म्हणे नागरिकांना महिलांशी असभ्य वर्तन न करण्याचे धडे देणार आहेत. ‘सिगरेटच्या पाकिटावर सिगरेट आरोग्याला धोकादायक आहे, असे लिहिले जाते, त्यातलाच हा प्रकार आहे. हे पालटण्यासाठी हिंदु राष्ट स्थापनेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’’
सौ. ज्योती ढवळीकर या वेळी मार्गदर्शनात म्हणाल्या, ‘‘सध्याचा काळ हिंदुत्वाच्या दृष्टीने ध्रूवीकरणाचा आहे. एकाला हिंदु राष्ट्र हवे आहे, तर एक मोठा गट हिंदु राष्ट्राला विरोध करत आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले जात आहे. देशात आज गोहत्या, आतंकवाद, भ्रष्टाचार, नक्षलवाद आदींमध्ये वाढ झालेली आहे आणि ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची निर्मिती हाच एकमेव उपाय आहे. यासाठी समस्त हिंदूंनी धर्माचरण केले पाहिजे, तसेच साधनाही केली पाहिजे. जेथे धर्म तेथे विजय हा निश्‍चित आहे. प्रत्येक हिंदूने राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी प्रतीदिन किमान एक घंटा दिला पाहिजे.’’ सभेच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख पंकज बर्वे यांनी करून दिली. सभेत सूत्रसंचालन सौ. साधना जोशी यांनी केले, तर आभारप्रदर्शन  भालचंद्र भाटीकर यांनी केले. हिंदु धर्मजागृती सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीत उपस्थितांनी वाळपई येथे धर्मशिक्षण वर्ग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेण्याची मागणी केली.