शिरोड्यात शिरोडकर यांना मतदारांची साथ:नाईक

0
887
गोवा खबर: शिरोडा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांनी मतदारसंघात शंभर कोटी रुपयांची विकासकामे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शिरोड्यातील प्रचार फेरीत सहभागी झाले त्यामुळे शिरोडकर यांच्या विकासाच्या दृष्टीला सरकारची साथ आहे हा संदेश सर्वत्र गेला आहे,अशी माहिती भाजपचे प्रवक्ता दत्तप्रसाद नाईक यांनी दिली.
 नाईक म्हणाले,शिरोडकर सध्या दिवसाचे १४ तास प्रचार करत आहे. मतदारसंघातील पाणी पुरवठा, रस्ते आणि बेरोजगारी या तीन मुद्यांभोवतीच प्रचार फिरत आहे. शिरोडकर हे शिरोड्यात मोठी शैक्षणिक संस्था चालवतात. त्यामुळे ते कौशल्य विकास कार्यक्रम राबवून शिरोडा मतदारसंघातील बेरोजगारी दूर करतील अशी आशा जनतेला वाटू लागली आहे.
शिरोडकर यांनी मतदारसंघाच्या विकासासाठीच भाजपमध्ये प्रवेश केला हे जनतेने आता स्वीकारले आहे. त्यांच्या प्रचार फेऱ्यांना मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.
फोंड्यापासून जवळच असलेला हा मतदारसंघ किमान सुविधांपासूनही वंचित आहे. या सुविधा पुरवण्यासाठी कोणता आराखडा तयार करण्यात आला आहे याची माहिती देत शिरोडकर सध्या घरोघरी प्रचार करतात तर सायंकाळी सात वाजल्यानंतर कोपरा बैठका घेत आहेत.
 मगोचे दीपक ढवळीकर यांनी वाहनांची मोठी फेरी काढून निवडणुकीच्या तोंडावर शक्तीप्रदर्शन केले होते. त्याला शिरोडकर यांनी मोठी पदयात्रा काढून प्रत्युत्तर दिले आहे. या पदयात्रेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सहभागी झाले होते ही शिरोडकर यांच्यासाठी जमेची बाजू आहे. ते निवडून आल्यावर शिरोड्याच्या विकासासाठी राज्य सरकारचे पूर्ण सरकार्य लाभेल हा संदेश देण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले आहेत,असे नाईक यांनी पत्रकारांना सांगितले.
आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा २० रोजी शिरोडा मतदारसंघात होणार आहे. शिरोडकर देत असलेल्या आश्वासनांवर या सभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मोहोर उमटवणार आहेत. त्यामुळे
शिरोडा मतदारसंघात शिरोडकर याची विजयी वाटचाल आता कोणी रोखू शकणार नाही असा दावा नाईक यांनी केला आहे.