शिरोडयात युवकांनी स्वप्नपुर्तीसाठी शिरोडकर यांना साथ द्यावी:मुख्यमंत्री

0
578
गोवा खबर:शिरोडयात भाजप उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्या प्रचारासाठी रविवारी शिरोडयातील युवकांतर्फे बाजार शिरोडा ते बोरी सर्कल दरम्यान  पदयात्रा काढण्यात आली. युथ क्लब ऑफ शिरोडातर्फे या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
 मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी पदयात्रेला उपस्थिती लावून कार्यकर्त्यांना  मार्गदर्शन करताना शिरोडयाच्या विकासासाठी शिरोडकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,  शिरोडयातील युवकाची स्वप्ने सुभाष शिरोडकर हेच साकारु शकतात. शिरोडयासाठी त्यांनी नियोजित केलेला प्रत्येक प्रकल्प व योजनाला सरकारचे पूर्ण सहकार्य असेल. त्यासाठी युवावर्गाने त्यांच्या पाठिशी रहायला हवे. आपले शिरोडयात येणे काही लोकांना अडसर ठरु लागले आहे. आपण मुख्यमंत्री असून गोव्यातील कुठल्याही भागात फिरु शकतो, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टिकेला  प्रत्युत्तर दिले.
सुभाष शिरोडकर यांच्या विजयासाठी आपण शिरोडा मतदार संघात उघडपणे वावरत आहे. आपली अडवणूक करु पाहणाऱ्यांना आपले जाहीर आव्हान असल्याचे गोविंद गावडे यांनी सांगत प्रियोळ प्रमाणे शिरोडया मधून देखील राजकारणामधील अपप्रवृत्तीना हद्दपार करा असे आवाहन केले.
 सुभाष शिरोडकर, जिल्हा पंचायत सदस्य दीपक बोरकर, शिरोडा गटाध्यक्ष सूरज नाईक, युवा मोर्चा अध्यक्ष कपिल बोरकर, मोलू वेळीप, पंच सुहास नाईक, सुनिल सावकर, मनुराय नाईक, रुपाली बोरकर, दीपिका नाईक, कमलाकांत गावडे, रामदास गावडे यांच्यासह सुमारे सहाशे कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत भाग घेतला होता.