शिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर

0
1104
गोवा खबर:शिरोडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला आज वेगळे वळण लागले.भाजपचे माजी उद्योग मंत्री महादेव नाईक यांनी  भाजपशी फारकत घेऊन काँग्रेसचा हात हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नाईक यांच्यासमोर सुभाष शिरोडकर यांच्या भाजप प्रवेशामुळे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता.काँग्रेसच्या माध्यमातून नाईक यांना आपले अस्तित्व पुन्हा निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.नाईक रविवारी काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश करणार आहेत.
शिरोडकर यांना काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये घेतल्यापासून नाईक पक्षावर नाराज आहेत.त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त देखील केली होती.
 नाईक यांच्या भाजप वरील नाराजीची दखल घेऊन काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व काँग्रेसमध्ये प्रवेश करावा अशी विनंती केली. त्यानुसार रविवारी प्रवेश करणे निश्चित केले आहे. तत्पूर्वी लगेच आपण भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहे, असे नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
 नाईक यांचा 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. तत्पूर्वी ते दोनवेळा शिरोडयात सुभाष शिरोडकर यांचा पराभव करून निवडून आले होते. नाईक दोनवेळा जिंकले तेव्हा त्यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. यापुढे पोटनिवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्ष तिकीट देण्याची शक्यता आहे. 90 च्या दशकात नाईक हे काँग्रेसचे सदस्य होते. आता त्यांची काँग्रेस पक्षात घरवापसी झाल्यानंतर शिरोडा मतदार संघात शिरोडकर यांना निवडून आणणे भाजपसाठी आव्हान ठरणार आहे.

आपण पक्षात प्रवेश केल्यानंतर मग तिकीट कुणाला द्यायचे ते पक्ष ठरवेल. अजून काही ठरलेले नाही, असे नाईक यांनी सांगितले आहे.
 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, की शिरोडा मतदारसंघात जे सुभाष शिरोडकर यांच्याविरोधात लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्या सर्वानी अगोदर काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असा आमचा प्रस्ताव आहे. मगो पक्षाचे उमेदवार वगळता आम्ही अन्य सर्व इच्छुकांना प्रस्ताव दिला आहे. आम्ही प्रत्येकाला जाऊन भेटत आहोत. तुकाराम बोरकर व डॉ. सुभाष प्रभुदेसाई यांनाही मी भेटलो आहे. अगोदर काँग्रेसमध्ये या, काँग्रेसचे सदस्य व्हा आणि मग एकत्र बसून तिकीट कुणाला ते ठरवूया. एकदा तिकीट निश्चित झाल्यानंतर सर्वानी मिळून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारासाठी काम करावे असे आम्हाला अपेक्षित आहे.
मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदारांना फोडून भाजपने त्यांना आपल्या गोटात आणले असले तरी त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या नेत्यांनी बंडखोरीची भाषा केल्याने भाजप समोरील संकट वाढले आहे.शिरोडयात महादेव नाईक आणि मांद्रे मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बंडाचे निशाण फडकवले असल्याने भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.दोन्हीपैकी एक जागा जरी गमावली तरी ती भाजपची नाचक्की ठरणार आहे.