गोवा:कांडा-शिमला येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असतात फरार झालेल्या दर्शन कुमार या आरोपीला कळंगुट पोलिसांनी नाट्यमयरित्या कळंगुट येथील मासळी मार्केट मधून दर्शनच्या मुसक्या आवळल्या.
दर्शन कुमार हा हिमाचल प्रदेश मधील अट्टल गुन्हेगार आहे.खून आणि लूटमार प्रकरणात दर्शनला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.ही शिक्षा तो कांडा-शिमला येथील तुरुंगात 2012 पासून भोगत होता. तुरुंगात दर्शन कडे बेकरीचे पदार्थ विकणे आणि स्वयंपाक घराशी संदर्भात कामे सोपवली गेली होती. 12 नोव्हेंबर रोजी तो तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला होता.त्यानंतर शिमला येथील सदर पोलिस स्थानकात यासंदर्भात पोलिस तक्रार दाखल झाली होती.
कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्याकडे दर्शन हा कळंगुट मध्ये असल्याची खात्रीशीर माहिती आली होती.दळवी यांनी लगेच पथक स्थापन करून शोध घेण्यास सुरुवात केली.सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर दर्शन हा कळंगुट मासळी मार्केट जवळ फिरत असताना या पथकाच्या निदर्शनास आला.पोलिस पथकाने गतीने हालचाल करत दर्शनच्या मुसक्या आवळल्या.दर्शन हा गोवा साडून अन्यत्र जाण्याच्या तयारीत होता.मात्र कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे दर्शनचा इरादा नाकाम झाला. दर्शनला अटक केल्या नंतर गोवा पोलिसांनी याची माहिती शिमला येथील सदर पोलिस स्थानकाला दिली असून त्यांना त्याचा ताबा घेण्यास सांगितले आहे.
कळंगुट पोलिसांनी पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करून दाखवली. या पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक विद्येश पिळगावकर,पोलिस उपनिरीक्षक सीताराम मळीक, पोलिस हवालदार विद्यानंद आमोणकर आदिंचा समावेश होता.