शिखर धवनची परदेशात पाच विक्रमी शतके

0
954

सलामीवीर शिखर धवनने  श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शानदार शतकी खेळी साकारली. या शतकी खेळीसोबतच शिखर धवने विक्रमांना गवसणी घातली. धवनने पहिल्या डावात १७ चौकारांच्या मदतीने ११९ धावा केल्या.

कसोटी कारकिर्दीतील शिखर धवनने आज आपले सहावे शतक झळकावले. शिखरने सहा शतकापैकी पाच शतके ही परदेशी खेळपट्ट्यांवर झळकावली आहेत. भारतीय संघाकडून अशी किमया साधणारा शिखर हा पहिलाच सलामीचा डावखुरा फलंदाज ठरला. त्याशिवाय श्रीलंकेविरुद्ध त्यांच्याच देशात तीन शतके झळकावून शिखरने चेतेश्वर पुजारा आणि माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागशी यांच्याशी बरोबरी केली आहे. भारतीय संघाकडून श्रीलंकेत सर्वात जास्त शतकं झळकवण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने पाच शतकं झळकावली आहेत.

शिखर धवन आणि के.एल. राहुल या सलामीच्या जोडीने डावाची दमदार सुरुवात केली. या दोघांनी १८८ धावांची सलामी दिली. श्रीलंकेच्या खेळपट्टीवर भारतीय संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी हा विक्रम नवज्योत सिंग सिद्धू आणि मनोज प्रभाकर यांच्या नावे होता. या दोघांनी १९९३ च्या दौऱ्यात सलामीला खेळताना १७१ धावांची भागिदारी केली होती.