शालेय विद्यार्थ्यांचा सगळा शैक्षणिक खर्च सरकारने करावा;काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

0
1559

गोवाखबर:भाजप आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे.सर्वसामान्य माणूस आर्थिक संकटात सापडला असून वाढत चाललेला शैक्षणिक खर्च आम आदमीला परवडण्यासारखा नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचा सगळा खर्च सरकारने करवा अशी मागणी काँग्रेसने राज्यपालां करवी सरकार कडे केली आहे.
गोवा काँग्रेसचे एनएसयुआय प्रभारी जनार्दन भंडारी यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना काल दिलेल्या लेखी पत्रात सरकारने शालेय विद्यार्थ्यांचा सगळा खर्च सरकारने करावा अशी प्रमुख मागणी केली आहे.याशिवाय विद्यार्थ्यांचा शाळेत येण्या जाण्याचा खर्च सरकारने उचलावा अशी काँग्रेसची मागणी आहे.बदललेल्या शाळांच्या वेळेबद्दल नाराजी व्यक्त करून शाळांची वेळ पर्वी प्रमाणे सकाळी 8 ते दुपारी 1 अशी पर्ववत करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
सरकार नको तिथे पैसे उडवण्यात धन्यता मानत असल्याचा आरोप करून काँग्रेस प्रवक्ता यतीश नाईक म्हणाले,सरकारने गोव्याचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांवर खर्च करण्याला प्राधान्य द्यायला हवे.मीरामार-दोनापावल रस्त्यावर सरकारने कारण नसताना उधळपट्टी केली आहे.तोच पैसा विद्यार्थ्यांसाठी वापरता आला असता. मांडवी वरील तीसरा पुल राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याने केंद्र सरकार खर्च करण्यास तयार असताना राज्य सरकारने त्यावर उडवलेले करोडो रुपये ही गंभीर गोष्ट आहे.हा पैसा राज्यात शिक्षण किंवा इतर महत्वाच्या कामांवर खर्च करता आला असता.
राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट बनण्यास सरकार जबाबदार असून सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे लोकांची कमाई घटली आहे.नवीन रोजगार तयार होत नसून अनेकांना रोजगार गमवावे लागले आहेत,असा आरोप करून नाईक म्हणाले,आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना वाढत्या महागाई मुळे मुलांचा शैक्षणिक खर्च परवडत नसल्याने त्यांची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी.