शुक्रवारपासून आयएफबी ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सवा’ची धूम

0
1221
• राज्यपाल मृदुला सिन्हा करणार उद्घाटन
• सिनेकर्मी मधुर भांडारकरची विशेष उपस्थिती
गोवाखबर:जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये गोमंतकीयांना ओढ असते ती पावसाची आणि गेल्या 11 वर्षांपासून सिनेरसिकांच्या मनामध्ये रुंजी घालणार्‍या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची. दरवर्षीप्रमाणेच गोमंतकीयांचा पावसाचा आनंद द्विगुणित करत, मराठी सिनेमाच्या जगतात रममाण करणार्‍या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, शुक्रवार 8 जून रोजी महोत्सवाचे उद्घाटन होत आहे.
 
गेल्या दहा वर्षांपासून गोवा आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील मराठी चित्रपट रसिकांचे मनोरंजन करत लोकप्रशंसा आणि लोकमान्यता मिळवणारा ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सव’ पुन्हा एकदा लोकरंजनासाठी सज्ज झाला आहे. गोव्यातील एक महत्वाचा आणि मान्यताप्राप्त सिनेमहोत्सव अशी ओळख कमावलेल्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे प्रदर्शन यावर्षी शुक्रवार 8 ते रविवार 10 जून दरम्यान पणजीतील गोवा कला अकादमी, मॅकेनिज पॅलेस, आयनॉक्स आणि 1930 (वास्को) या सिनेगृहांमध्ये होणार आहे. यामध्ये वर्षभरातील महत्वाचे मराठी चित्रपट, लोकप्रिय कलाकार- दिग्दर्शकांची प्रमुख उपस्थिती, रेड कार्पेट, सिनेमाधारित विशेष चर्चासत्रे, शैक्षणिक कार्यशाळा, नामवंत कलाकारांना मानवंदना, नव्या सिनेमांचे प्रिमिअर आदींचा समावेश असणार आहे.
यावर्षीच्या महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याहस्ते पारंपरिक पध्दतीने दिपप्रज्वलन करुन होणार आहे. यावेळी राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, खासदार संजय राऊत, राष्ट्रीय पुरस्कारविजेता सिनेकर्मी मधुर भांडारकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. उद्घाटनानंतर विविध मनोरंजक कार्यक्रम सादर होतील. त्याचप्रमाणे यावर्षाच्या महोत्सवाचा शुभारंभ सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित दिग्दर्शक द्वयांच्या ‘वेलकम होम’ या चित्रपटाच्या ‘वर्ल्ड प्रिमिअर’ने होईल.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा कृतज्ञता पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त गोमंतकीय पार्श्वगायिका लॉर्ना यांना प्रदान करण्यात येणार आहे.
यावर्षी रसिकांना पिंपळ (दिग्द. गजेंद्र अहिरे), पळशीची पीटी (दिग्द. धोंडिबा कारंडे), इडक (दिग्द. दिपक गावडे), सत्यजित रे : लाइफ अ‍ॅण्ड वर्क (दिग्द. विशाल हळदणकर), गुलाबजाम (दिग्द. सचिन कुंडलकर), न्यूड (दिग्द. रवी जाधव), बबन (दिग्द. भाऊसाहेब कर्हाडे), आम्ही दोघी (दिग्द. प्रतिमा जोशी), झिपर्‍या (दिग्द. केदार वैद्य), कच्चा लिंबू (दिग्द. प्रसाद ओक), लेथ जोशी (दिग्द. महेश जोशी), रणांगण (दिग्द. राकेश सारंग), बकेट लिस्ट (दिग्द. तेजस प्रभा विजय देऊस्कर), रेडू (दिग्द. सागर वंजारी), व्हॉटस्अप लग्न (दिग्द. विश्वास जोशी) या मराठी चित्रपटांसोबत जुझे (दिग्द. मिरांशा नाईक) या सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या कोकणी चित्रपटाचाही आस्वाद घेता येणार आहे. तर  बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम निर्मित, स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाच्या जागतिक प्रिमिअरने महोत्सवाचा समारोप होणार आहे.केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळा होणार आहे.यावेळी चित्रपट सृष्टी मधील दिग्गज कलाकार उपस्थित असणार आहेत.
या महोत्सवाला मराठी चित्रपट जगतातून खूप उत्स्फूर्त आणि प्रोत्साहक प्रतिसाद सुरुवातीपासूनच लाभत असून, गोव्यामध्ये चित्रपट संस्कृती रुजवण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून सकारात्मक प्रयत्न होत आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मराठी चित्रपट जगतातील विविध मान्यवर कलाकार महोत्सवासाठी उपस्थित राहणार असून, यामध्ये महेश मांजरेकर, सचिन कुंडलकर, सचिन पिळगांवकर, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, राकेश बापट, प्रिया बापट, स्पृशा जोशी यांचा प्रमुख समावेश असणार आहे.
 आजवर विक्रम गोखले, अमोल पालेकर, नाना पाटेकर, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, महेश मांजरेकर, रवी जाधव, सचिन खेडेकर, वर्षा उसगांवकर आदी मान्यवर कलाकारांनी उपस्थिती नोंदवली आहे.
वर्षांगणिक गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद, प्रेक्षकांचे प्रेम आणि मराठी चित्रपटसृष्टीकडून मिळणारा पाठिंबा आमचा उत्साह आणि आनंद वाढवणारा आहे. फक्त व्यावसायिकदृष्ट्याच नाही तर समिक्षकांनी गौरवलेल्या पण विविध कारणांमुळे सिनेगृहांपर्यंत पोहोचू न शकलेले आशय-विषयाने समृध्द विविध मराठी सिनेमे या महोत्सवाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवता येतात, याचे विशेष समाधान असल्याचे आयोजक सांगितले. मराठी चित्रपटांच्या रसिकांच्या आवडीनिवडी लक्षात घेत ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सवा’ची प्रामुख्याने आखणी करण्यात आली आहे. निवडसमितीने साकल्याने विचार करत या महोत्सवासाठी निवडलेले सिनेमे रसिकांच्या सर्वार्थाने पसंतीला उतरतील असा विश्वास आम्हा सगळ्यांनाच आहे. हा महोत्सव जरी गोव्यामध्ये होत असला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरुन देखील या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दशकभरानंतर अधिक समृध्द झालेल्या या महोत्सवावर याहीवर्षी रसिक भरभरुन प्रेम करतील, अशी अपेक्षाही यावेळी आयोजकांनी व्यक्त केली.
‘विन्सन वर्ल्ड’ या आघाडीच्या गोमंतकीय संस्थेच्या माध्यमातून आयोजित होत असलेल्या या महोत्सवाला गोवा कला अकादमी सिनेगृह प्रायोजक आहे. तर टायटल पार्टनर म्हणून आयएफबी, डिजिटल अ‍ॅण्ड ब्रॉडकास्ट पार्टनर म्हणून ‘प्लॅनेट मराठी’ असणार आहे. या महोत्सवात ‘प्लॅनेट मराठी’च्यावतीने विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, प्रसिध्द निवेदक अमित भंडारी सूत्रसंचालन करणार आहे. या चर्चासत्राचे लाइव्ह स्ट्रिमिंग होणार आहे. या महोत्सवातील काही चित्रपटांचे विशेष प्रदर्शन वास्कोस्थित ‘1930’ या नव्याने साकारलेल्या सिनेगृहामध्येही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गोव्यासह महाराष्ट्र अणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात रसिकाश्रय मिळत असलेल्या या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी…
• विन्सन ग्राफिक्स, 309, तिसरा मजला, गेरा एम्पोरिअम 2, पाटो प्लाझा, पणजी.
• गोवा कला अकादमी, कांपाल, पणजी.
• नाटेकर फार्मसी, 5, शिवसागर अपार्टमेंट, मारुती मंदिराजवळ, म्हापसा.
• विन्सन ग्राफिक्स, हॉटेल अनंताश्रमच्या शेजारी, वास्को.
• रंग रचना, विवेक बिल्डिंग, स्टेट बँक ऑफ इंडियासमोर, खडपाबांध, फोंडा.
• माया बुक स्टोअर, 1, विट्रोस मॅन्शन, इसिडोरिओ बाप्टीस्टा मार्ग, ग्रेस चर्चच्या मागे, मडगाव
आदींसह बुकमायशो डॉट कॉम याठिकाणी सुरु आहे.
अधिक माहितीसाठी गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत फेसबुक पेज: https://www.facebook.com/gmffonline/
वेबसाईट : http://www.vinsanworld.com/gmff/ यावर भेट द्या.