शंभरहून जास्त महिलांचा आप च्या बाणावली शाखेत प्रवेश  

0
498
गोवा खबर: बाणावली मतदारसंघातील आणि विशेषतः कारमोणा गावातील 80 ते 100 महिलांनी बाणावली मतदारसंघाच्या आम आदमी पक्षाच्या महिला शाखेत नुकताच प्रवेश केला. यावेळी आम आदमी पक्षाचे नेते आणि प्रवक्ते वेन्झी व्हिएगश आणि आम आदमी पक्षाच्या महिला शाखेच्या  प्रमुख श्रीमती सेसिल रॉड्रीग्ज उपस्थित होत्या.
 यावेळी बोलताना कॅप्टन वेन्झी व्हिएगश म्हणाले, आता महिलांनी पुढे आले पाहिजे. विशेषतः बाणावली मतदारसंघातील महिलांनी आघाडी घ्यावी कारण त्यांची संख्या आता पुरुषांपेक्षा जास्त आहे.
 आपमध्ये प्रवेश केलेल्या फ्लोसी रॉड्रीग्ज म्हणाल्या, काँग्रेस आणि भाजप सारखे राजकीय पक्ष लोकांचा फक्त वापर करून घेत असल्याने आता आम्ही त्यांना कंटाळलेलो आहोत. या राजकीय पक्षांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी गोवा आणि गोमंतकीय लोकांचा सर्वनाश करून ठेवला आहे. आम आदमी पक्ष हा एकच पक्ष असा आहे सर्वसामान्य लोकांनी सर्वसामान्य लोकांसाठी स्थापन केलेला आहे.
श्रीमती ओलडा जॉर्ज यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या महिला गोव्यात राहतात पण त्यांच्या नवऱ्यांना सातासमुद्रापार विदेशात जाऊन काम करावे लागते आणि त्यामुळे त्यांना चुकीचे सरकार आणि प्रशासन यांना तोंड द्यावे लागते. गोव्यात राहत असल्यामुळे सर्व आम्हालाच सहन करावे लागते. त्यामुळे आता महिलांनी पुढे येण्याची हीच योग्य वेळ आहे आणि एकमेकांना सावरण्याचीही.
 यावेळी उपस्थित असलेल्या आम आदमी पक्षाच्या महिला शाखेच्या नेत्या श्रीमती पेट्रिशिया फर्नांडिस म्हणाल्या, आमच्यासारख्या महिलांना घर चालविणे फार कठीण झाले आहे कारण भाज्यांचे दर आता आकाशाला भिडत आहेत आणि सरकार आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. सध्याचे सरकार सक्षम नाही आणि त्यामुळे अशी वेळ येऊन ठेपली आहे जेव्हा आम्हा महिलांना असे सरकार निवडावे लागेल जे महिलांसाठी काम करेल.  या कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील जनतेसाठी मेडिकल इक्वीपमेन्ट फॅसिलिटेटिंग युनिटचे उदघाटन करण्यात आले ज्याच्या माध्यमाने गरजू व्यक्तींना वैद्यकीय उपकरणे देण्यात येतील ज्यांचा वापर झाल्यावर त्या वस्तू परत करता येणार आहेत.
यावेळी कॅप्टन वेन्झी या सुविधेविषयी बोलताना म्हणाले, “व्हील चेयर, क्रचेस आणि हॉस्पिटल बेड्स अथवा खाटा यांचे वितरण आम्ही करणार आहोत “. त्यांनी पुढे सांगितले की महिला या कुटुंब आणि समुदायाची काळजी घेत असल्याने महिला शाखेची सुरूवात गावातच करणे यथायोग्य आहे.