‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा

0
783
हिंदु जनजागृती समितीची शासकीय अधिकार्‍यांकडे मागणी 
पणजी –  ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने येथील पणजी, वास्को, फोंडा, म्हापसा, पेडणे आणि डिचोली येथील शासकीय अधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याअनुषंगाने पोलिसांची विशेष पथके नियुक्त  करणे, महाविद्यालय परिसरात गस्त वाढवणे, वेगाने वाहने चालवणार्‍यांवर कारवाई करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनाची एक प्रत स्थानिक पोलिसांनाही देण्यात येणार आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा भारतातही रूढ झाली आहे. पाश्‍चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्‍वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच, या दिवशी होणार्‍या मेजवान्यांमधून युवक-युवती यांच्यात मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन आदी अपप्रकारांत प्रचंड वाढ झाली आहे. इतकेच नव्हे, तर या दिवशी संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीत होणारी मोठ्या प्रमाणातील वाढ अनैतिक संबंधांतील वृद्धी दर्शवते. या दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होतात. थोडक्यात ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा-महाविद्यालयाच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
१४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन देण्याची मागणी हिंदु जनजागृती समिती तालुक्यातील विविध विद्यालयांच्या व्यवस्थापनांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करत आहे. ‘मातृ-पितृ पूजनदिना’च्या माध्यमातून युवा पिढीसमोर एक आदर्श पर्याय निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे.