व्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा आढावा घेणाऱ्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे नवी दिल्लीत उद्‌घाटन

0
995

 

 गोवा खबर:व्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा आढावा घेणाऱ्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आज नवी दिल्लीत उद्घाटन झाले. भारतात होणारी ही दुसरी व्याघ्रपरिषद आहे. जागतिक व्याघ्र संवर्धन कार्यक्रमाच्या  सद्यस्थितीवर यात चर्चा होणार असून वाघांचे अस्तित्व असलेल्या 13 देशांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत. त्याशिवाय वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी देखील या परिषदेत चर्चा होईल. 

 

केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की,व्याघ्रसंवर्धन ही आपल्या प्रत्येकाचीच जबाबदारी असून, ती चिकाटीने पार पाडली पाहिजे. वाघांचे संवर्धन करण्यासाठी नवनव्या कल्पक योजना राबवायला हव्यात, असे ते म्हणाले.

वर्ष 2010 मध्ये पिट्सबर्ग येथे झालेल्या परिषदेत, वर्ष 2020 पर्यंत जगातील वाघांची संख्या दुपटीने वाढवण्याचा वचननामा स्वीकारण्यात आला होता.त्यावेळी भारतात वाघांची संख्या 1411 इतकी होती, 2014 साली झालेल्या व्याघ्रगणनेनुसार ती 2226पर्यत पोहोचली. विविध पातळ्यांवर झालेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही संख्या वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. 2018 च्या व्याघ्रजनगणनेचे संकलन अद्याप सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

या परिषदेत, जागतिक स्तरावर व्याघ्रसंवर्धनासाठी विविध सहभागी देशांचे प्रतिनिधी आपले अनुभव आणि पद्धतींची माहिती देतील. या परिषदेदरम्यान, भारत, भूतान आणि नेपाळ या देशांचे प्रतिनिधी उपखंडातील वाघ आणि अन्य वन्यप्राण्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांचा आढावा घेतील.

केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालय तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन परिषद यांनी ही परिषद आयोजित केली आहे.