वेश्याव्यवसायासाठी उझबेकि तरुणींचा वापर;कळंगुट पोलिसांनी उध्वस्त केले रॅकेट

0
1019
गोवाखबर :जीवाचा गोवा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना जाळयात ओढून वेश्या व्यवसाय चालवणारे दलाल बऱ्याचदा विदेशी तरुणींचा वापर करत असतात.अशाच प्रकारे चालवले जात असलेले सेक्स रॅकेट कळंगुट पोलिसांनी उध्वस्त केले. पोलिसांनी 3 उझबेकि आणि 2 भारतीय तरुणींची सुटका करताना 2 दलालांना बेडया ठोकण्यात यश मिळवले आहे.
कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट उध्वस्त करण्यात यश मिळवले आहे.कळंगुट पोलिसांनी कांदोळी येथे धाड टाकून 3 विदेशी आणि 2 देशी तरुणींच्या वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.
बामोनवाडो-कांदोळी येथील एका गेस्ट हाउस मधून एक जण सेक्स रॅकेट चालवत असल्याची खात्रीशीर माहिती कळंगुट पोलिसांना मिळाली होती.पोलिस निरीक्षक दळवी यांनी एनजीओच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन धाड टाकण्याची तयारी केली. बामोनवाडो येथील ग्रीन पीस हॉलिडे होम्स मधून हे रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दळवी यांनी पोलिस आणि एनजीओच्या कार्यकर्त्यांचे पथक तयार करून त्या गेस्ट हाउसवर धाड टाकली.
पोलिसांनी गेस्ट हाउसला चारी बाजूंनी घेरुन धाड टाकली.जेव्हा पोलिसांनी गेस्ट हाउस मधील खोल्याची झड़ती घेतली तेव्हा एक दलाल 5 युवतींसह तेथे आढळून आला.धाडीत 3 युवतीं उझबेकि आणि 2 भारतीय युवती हैदराबाद आणि महाराष्ट्रा येथील असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी अटक केलेला दलाल हा ओडिशा येथील असून धनंजय मोहंती असे त्याचे नाव आहे.या धाड़ी वेळी मोहंती कडून 1 लाख 25 हजार रूपयांची रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली.त्याशिवाय 7 मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.धाड टाकल्या नंतर पोलिसांनी गेस्ट हाउसला सील ठोकले आहे.सुटका केलेल्या युवतींची रवानगी मरेशी येथील अपना घर मध्ये करण्यात आली आहे.
युवतींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मूळ ओडिशा येथील चंदन कुमार पात्रा याला देखील अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.चंदन हा फोन द्वारे या युवतींना ग्राहक पुरवत होता.सुटका केलेल्या युवतींकडून त्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत कळंगुट सर्कल जवळ चंदनच्या मुसक्या आवळल्या.चंदन हा गोवा सोडून पळून जाण्याची तयारी करत होता.सध्या दोन्ही दलाल पोलिस कोठडीत असून  पोलिस निरीक्षक दळवी पुढील तपास करत आहेत.