वेदांताद्वारे विकसित संगणक प्रयोगशाळेचे गोवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमोणे शासकीय विद्यालयामध्ये उद्घाटन; शिक्षकांचाही गौरव

0
1580
 गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज वेदांता सेसा गोवा आयर्न ओरद्वारे विकसित संगणकीय प्रयोगशाळेचे आमोणे शासकीय विद्यालयामध्ये उद्घाटन करण्यात आले. यानंतर विद्यालयातील उत्तम कामगिरी केलेल्या शिक्षकांचाही गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
पूर्णतः नव्याने विकसित या संगणकीय प्रयोगशाळेचा लाभ संगणकआधारित ई-लर्निंग करण्यासाठी आमोणे शासकीय विद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षकवृंदाला होणार आहे. विविध प्रकारची पायाभूत संगणकीय कामे शिकण्याबरोबरच संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील आकर्षक रोजगार संधी घेण्याबाबतचा पायाही या मुलांना बनवता येणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमास वेदांता लिमिटेडचे व्हॅल्यू एडेड व्यवसाय संचालक  एन. एल. व्हट्टे, शाळेच्या पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी, शालेय व्यवस्थापकीय समितीचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी यांची उपस्थिती राहिली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “वेदांताच्या या उदात्त व संस्मरणीय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्याचा अनुभवाधिष्ठित शिक्षण मिळण्याबरोबरच या ज्ञानाचा प्रत्यक्ष कामांमध्ये कसा वापर करता येतो याची जाणीवनिर्मितीसाठी होणार आहे. आजच्या तंत्रज्ञानाधिष्ठित जगामध्ये संगणकीय कौशल्य महत्त्वाचे आणि अपरिहार्य बनले आहे. सर्वंकष सामाजिक-आर्थिक विकासासाठी वेदांताद्वारे राबवण्यात येणारे सातत्यपूर्ण प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहेत.
आज गोव्यातील जनतेसमोरची आव्हाने पाहता अशा प्रकारच्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित होते आहे. केवळ गोव्यातच नाही, तर भारतासह विदेशांत उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक व करिअरच्या संधी घेण्यासाठी अशा प्रकारच्या शैक्षणिक सुविधांचा पुरेपूर वापर करत आपला कौशल्यविकास करावा, असे आवाहन या निमित्ताने मी गोव्यातील सर्व विद्यार्थिवर्गाला करू इच्छितो. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व कौशल्य विकासासाठी आणि त्यांना भविष्याचे जबाबदार नागरिक बनवण्यासाठी अविरतपणे काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याप्रती मी सर्वांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. या भागातील विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी या संगणकीय प्रयोगशाळा सुविधेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन मी करतो आहे.”
 एन. एल. व्हट्टे म्हणाले, “शाश्वतता आणि सामाजिक विकास या बाबी वेदांताच्या व्यावसायिक विचारधारेच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत. एक जबाबदार व्यावसायिक संस्था म्हणून आम्ही नेहमीच समाजाच्या सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासासाठी आमचे योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आमच्या सीएसआर धोरणामध्ये शिक्षण हे एक महत्त्वाचे क्षेत्र राहिले आहे. याअंतर्गत सेसा टेक्निकल स्कूल, ई-शिक्षा, गोवा मायनिंग अभियांत्रिकी महाविद्यालय, स्मार्ट क्लास, जागृती कार्यक्रम असे विविध उपक्रम शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी राबवत आहोत. समाजातील विविध घटकांसमवेत समाजाच्या हितासाठी काम करत राहण्याचा आमचा वसा आहे.”
विद्यालयात संगणकीय प्रयोगशाळेचा विकास करणे आणि शिक्षकांचा गौरव याप्रती विद्यालयाचा पालक-शिक्षक संघ आणि व्यवस्थापन समितीद्वारे आनंद व्यक्त करण्यात आला. या सुविधेचा विद्यार्थ्यांना दीर्घकाली लाभ होणार असून सातत्याने बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करण्यास ही सुविधा साह्यभूत ठरणार आहे.