वीज बिलांतील निश्चित शुल्कात ५० टक्के सवलत देण्याची  घोषणा करुन मुख्यमंत्र्यानी सामान्यांच्या जखमेवर मिठ चोळले:पणजीकर

0
644
गोवा खबर:केवळ घोषणाबाजी करण्यात पटाईत असलेल्या भाजप सरकारने वीज बिलांतील निश्चित शुल्कात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करुन मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी सामान्यांच्या जखमेवर मिठ चोळले आहे ,अशी टिका गोवा प्रदेश काॅंग्रेस समितीचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. सुट-बुट वाल्यांचे सरकार घरी पाठवण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले.
यवेळी त्यांच्या सोबत माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, डिचोली गट अध्यक्ष मेघश्याम राऊत व समाज माध्यम प्रमुख प्रतिभा बोरकर उपस्थित होत्या.
केवळ आपली जाहिरातबाजी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटात असलेल्या जनतेला कोरोनावर मात करण्यासाठी दिवे लावण्याचे आवाहन केले होते.तसेच गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यानी श्रीराम मंदिराच्या भूमि पुजन दिनी मोदींचे बॅनर लाऊन घरांवर रोषणाई करण्यास लोकांना सांगीतले होते याची आठवण करून देत पणजीकर यानी सरकारला आता लोकांनी वीजेचा वापर जास्त केला म्हणण्याचा नैतीक अधिकार नाही अशा शब्दात सरकारला सुनावले.
सरकारने निश्चित शुल्कात दिलेली ५० टक्के सवलत म्हणजे एकुण बिलाच्या रकमेतील २ टक्के सुद्धा होत नाही हे पणजीकर यानी स्पष्ट केले आहे.
पणजीकर म्हणाले,भाजप केवळ त्यांच्या राजकीय फायद्यासाठी जनतेचा हवा तसा वापर करत आला आहे. संकटकाळात मदतीचा हात देण्यात भाजपचे सरकार आता नकार देत आहे हे जनतेने ध्यानात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
काॅंग्रेस पक्षाने काल समाजमाध्यमांवर ” स्पिक अप फाॅर गोवा ” मोहीम राबवली होती व त्याला संपुर्ण गोव्यातुन हजारो लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. लोकांनी वीज बिलांत सवलत देण्याची उघड मागणी सरकारकडे केल्याने, बिथरलेल्या मुख्यमंत्र्यानी सारवासारव करण्यासाठी रात्री ५० टक्के सवलतीची घोषणा करुन लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचे काम केले असा आरोप पणजीकर यानी केला आहे.
काॅंग्रेस पक्षाने यापुर्वीच सरकारला निवेदन सादर केले आहे. त्यात जनतेला दिलासा देणारे चार पर्याय सुचवले आहेत. आम्ही त्यापासुन कदापी मागे हटणार नाही. चार पर्यांयावर विचार करण्यास सरकारला आम्ही भाग पाडणारच आहोत असे  पणजीकर म्हणाले.
हाॅटेल व्यवसाय बंद असताना हजारो रुपयांची बिले सरकारने त्यांना पाठवली आहेत. गोव्यातील इतर व्यावसायीकांची परिस्थीती अत्यंत बिकट असुन, सरकारने संवेदनशीलता न दाखवल्यास, “पाव नसेल तर केक खा” असा सल्ला देणारी फ्रांसची राणी मॅरी आंतोनेत यांचा जसा गळा लोकांनी त्याकाळी कापला होता तसा भाजप सरकारचा गळा गोमंतकीय जनता कापुन टाकणार आहे असा इशारा आग्नेल फर्नांडिस यानी दिला.
सरकारने त्वरित यावर तोडगा न काढल्यास गोमंतकीय जनतेला बरोबर घेऊन हजारोंच्या संख्येने आंदोलन करण्यास आम्ही आता मागे पुढे पाहणार नाही असा इशारा पणजीकर यांनी दिला आहे.