‘विस्फी’साठी महिला लघुपटकर्मींना आवाहन

0
1426

‘सहित’चे आयोजन; गोव्यात होणार तिसरी आवृत्ती

गोवा खबर:महिला दिग्दर्शकांना प्रोत्साहन मिळून, त्यांच्या संख्येमध्ये गुणात्मक वाढ व्हावी आणि महिलांच्या लघुपटांना उत्तम प्रेक्षक मिळावा यासाठी ‘सहित’ संस्थेच्यावतीने महिला दिग्दर्शकांच्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव म्हणजेच ‘वुमन्स इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ (विस्फी) या देशातील एकमेव सिनेमहोत्सवाचे आयोजन करण्यात येते. 2020 हे सदर महोत्सवाचे तिसरे वर्ष असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या लघुपट प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन सहितच्यावतीने करण्यात आले आहे.

जगातील पहिली दिग्दर्शिका एलिस गाय ब्लाचे यांच्या 50 व्या स्मृतीदिननिमित्ताने  ‘विस्फी’ची पहिली आवृत्ती मार्च 2018 मध्ये गोव्यामध्ये अत्यंत उत्साहात पार पडली. पहिल्या वर्षापासूनच विस्फीला देशविदेशातील महिला लघुपटकर्मींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, तिसर्‍या वर्षासाठी आवाहन करण्यापूर्वीच आत्तापर्यंत भारतासह रशिया, युक्रेन, फिलिपाइन्स, बांग्लादेश, अमेरिका आदी देशांतील महिला दिग्दर्शिकांनी आपले लघुपट ‘सहित’कडे पाठवून दिले असल्याचे आयोजक किशोर अर्जुन यांनी सांगितले. यावर्षी लघुपटांच्या प्रवेशिका ऑनलाइन स्वीकारत असल्याने अधिक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षाही ’सहित’च्यावतीने करण्यात आली.

‘विस्फी’मध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही वयोगटातील महिला दिग्दर्शकांनी तयार केलेला कोणत्याही विषयावरील कमाल 30 मिनिटांपर्यंतचा, सबटायटल्स असलेला लघुपट किंवा माहितीपट 31 जानेवारी 2020 पूर्वी WISFFIGOA@GMAIL.COM या ईमेल आयडीवर पाठवून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी WISFFIGOA@GMAIL.COM या ईमेल आयडीवर किंवा 788 794 4694,  927 290 7095 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.