विष्णू वाघांविरोधातील एफआयआरचा महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून निषेध

0
1003

मुंबई :विष्णू वाघ लिखित सुदिरसूक्त वरुन गोव्यात उठलेले वादळ आणि वाघ यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्ररीचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत.आज मुंबईत प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या आवारात विष्णू वाघ यांच्याविरोधात नोंदवलेल्या तक्रारीला विरोध करण्यासाठी निषेध सभेत महाराष्ट्रातील वाघ यांचे समर्थक साहित्यिक आणि कलाकार सहभागी झाले होते. यावेळी वाघ यांच्या कविता वाचून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध नोंदवण्यात आला.
काही वर्षांपूर्वीच्या कवितांविरोधात तक्रार नोंदवली जात असेल तर संत तुकाराम, नामदेव ढसाळ, बाबूराव बागुल यांच्याविरोधातही अनेक तक्रारी नोंदवाव्या लागतील, असा सुर यावेळी उपस्थितांनी बोलताना व्यक्त केला. या निषेध कार्यक्रमात प्रसिद्ध कवी सौमित्र यांनी गांधी आणि सेक्युवर या वाघ यांच्या दोन कविता सादर करून वाघ यांच्या विरोधात तक्रर दाखल करणाऱ्यांचा कडक शब्दात समाचार घेतला. कवयित्री नीरजा यांनी समाजातील विषमता, विद्रोह मांडण्याचा हक्क प्रत्येकाला आहे असे सांगत स्त्रियांनीसुद्धा अशा पद्धतीची भाषा वापरली आहे, असे स्पष्ट केले. सध्या मोकळेपणाने लिहायचे की जपून लिहायचे असा प्रश्न निर्माण झाला असून जपून लिहिले तर आत साठलेले बाहेर येणार नाही, त्यामुळे मोकळेपणाने लिहा, असा धीर दिला. त्यांनी यावेळी हरदास ही वाघ यांची कविता उपस्थितांना ऐकवली.
ज्येष्ठ पत्रकार इब्राहिम अफगाण यांनी या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी विषद केली. निषेध करणारे वादाच्या बाजूने नाहीत तर संवादाच्या बाजूने आहेत असाही खुलासा अफगाण यांनी केला. या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी वाघ यांच्या फरक या सध्या वादग्रस्त ठरलेल्या कवितेने केली. या निषेध सभेचे आयोजक ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारपर्यंत आवाज पोहोचवत असल्याचे सांगितले. वाघ यांच्याविरोधात नोंदवलेली तक्रार मागे घ्यावी आणि त्यांची माफी मागावी अशीही मागणी त्यांनी केली. राज्य सरकारने गोवा सरकारला यासंदर्भात कळवावे असेही ते म्हणाले. सूदिरसूक्तमधील कविता सध्याच्या काळाशी सुसंसगत आहेत. अशा कवितांविरोधात, कवी आणि प्रकाशकाविरोधात तक्रार नोंदवण्याआधी त्या किमान वाचाव्यात असे या निषेध कार्यक्रमात जाहीर आवाहन करण्यात आले आहे.