विमान प्रवासी देखील चाचणी शिवाय येऊ शकणार गोव्यात

0
459

गोवा खबरर:जीवाचा गोवा करण्यासाठी विमानाने तुम्ही गोव्यात येण्याचा विचार करत असाल तर बॅग भरा आणि बिंदास्त यायला निघा कारण दाबोळी विमानतळावर उतरल्या नंतर तुम्हाला कोविड निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार ना स्वतःची कोविड टेस्ट करून घ्यावी लागणार आहे.

केंद्राच्या मार्गदर्शक तत्वां प्रमाणे गोवा सरकारने गोव्यात प्रवेशावरील सर्व निर्बंध हटवल्याने आता कोणीही गोव्यात येऊ शकणार आहे,गोवा विमानतळ प्राधिकरणने ट्वीट करून ही माहिती दिली आहे.यापूर्वी विमान प्रवाशांना गोव्यात येताना कोविड निगेटीव्ह असल्याचे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र किंवा गोव्यात उतरल्या नंतर स्वतःची कोविड टेस्ट करून घ्यावी लागत होती.गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार आता गोव्यात रस्ता,रेल्वे आणि विमानमार्गे येणारे प्रवासी कोणत्याही निर्बंधांशिवाय गोव्यात येऊ शकणार आहेत.
गोव्यात पर्यटन व्यवसाय सुरु झाला आहे.यापूर्वीच हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.वाइन शॉप आणि रेस्टोरेन्ट देखील सुरु होती.आज पासून बार सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे पर्यटन व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.