विमान खरेदीचे सत्य पुढे येइपर्यंत, राफेलचे भूत प्रकट पर्रिकरांचा वारसा पुढे नेणाऱ्यांना सतावत राहील : गिरीश चोडणकर 

0
133
गोवा खबर : राफेल लढाऊ विमान खरेदीत प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचे  फ्रेंच न्यूज पोर्टल “मीडियापार्ट”ने केलेल्या खळबळजनक वृताने आता पुन्हा एकदा माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या भूमिकेबद्दल  संशयाचे धुके तयार झाले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या वायरल झालेल्या ‘ऑडिओ टेप संदर्भात चौकशी होणे आता  निर्णायक आहे असे  गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.
या प्रकरणातील सत्यता पुढे येईपर्यंत राफेलचे भूत मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेणाऱ्यांना सतावत राहील असे चोडणकर यांनी सांगीतले.
चोडणकर म्हणाले की “मीडियापार्ट”ने या राफेल लढाऊ विमान खरेदीत भारतातील मध्यस्थाला लाच दिल्याचे व भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच फ्रांस मधील भ्रष्टाचार विरोधी विभागाने या बाबत सरकारला खबरदारही केले आहे.
तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कपाटांमध्ये वादग्रस्त राफेल खरेदी कराराच्या  सीक्रेट फाइल्स असल्याचा गौप्यस्पोट आरोग्यमंतत्री विश्वजीत राणे यांनी ऑडिओ टेपद्वारे केला होता. आता तेथील भ्रष्टाचार विरोधी विभागाने भ्रष्टाचाराला दुजोरा दिल्याने, या ऑडिओला ही महत्त्व प्राप्त झाले आहे असे  गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
राफेल खरेदी करार संबंधित प्रश्नांना उत्तर देताना माजी संरक्षणमंत्री नेहमीच अस्वस्थ दिसायचे. ज्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पॅरिसमध्ये राफेल खरेदी करार निश्चित केली होती त्यादिवशी पर्रीकर गोव्यात सरकारी  दुकानातून मासे विकत होते. ह्या कोटी रुपयांच्या करारा बाबत त्यांचे एकूणच वर्तन नेहमीच संशयास्पद राहिले असा दावा गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
केंद्रातील तसेच राज्यातील भाजपा सरकारने, विरोधी पक्षांविरूद्ध सीबीआय, ईडी, एनआयए आणि इतर संस्थांचा नेहमीच वापर केला आहे.  मात्र आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केलेल्या खुलाशांकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष तर केले आहेच, त्याच बरोबर मौन बाळगले आहे. या संदर्भात  मनोहर पर्रीकर सूड घेणार या भीतीने हा फॉर्म्युला सत्ताधारी भाजपने स्वीकारला असावा असे चोडणकर पुढे म्हणाले.
तथाकथित मध्यस्थांना दिलेले १.१ दशलक्ष युरो एवढी मोठी रक्कम दोनापावलाच्या पठारावर पोहोचली होती का आणि स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या तिजोरीत ती अवतरल्याची शक्यता आहे असे ते पुढे म्हणाले.
फ्रेंच तपास संस्थेने आता खुलासा केला आहे की २०१६ मध्ये या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर, राफेल लढाऊ विमानांचे उत्पादक डॅसॉल्टने डेफिस सोल्यूशन्सला १.१ दशलक्ष युरो दिले होते. सुमारे  36  राफेल लढाऊ विमान खरेदीसाठी 60000 कोटी रुपये खर्च झाले आहेत असे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
“सत्य नेहमीच पुढे येते आणि कायम राहते” अशी एक म्हण आहे. आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी “चौकीदार चोर है” ही  घोषणा देऊन सत्य प्रकट केले होते. मध्यस्थाला पैसे दिल्याने आता पुन्हा एकदा राहुल गांधींचे शब्द खरे ठरले आहेत. या करारा नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यात कटूता निर्माण झाल्याचे चोडणकर म्हणाले.
केंद्रातील भाजप सरकारने संयुक्त संसदीय समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची कॉंग्रेस पक्षाची मागणी मान्य केलीच पाहिजे असे गिरीश चोडणकर म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संयुक्त संसदीय समितीला  तोंड देण्याचे धाडस दाखवावे  असे आव्हान गिरीश चोडणकर यांनी दिले.