विन्सन वर्ल्डच्या ‘स्थलपुराण’ मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

0
1078
गोवाखबर:विन्सन वर्ल्ड निर्मित स्थलपुराण या नव्या कोऱ्या मराठी  चित्रपटाचा मुहूर्त आज प्रसिद्ध उद्योगपती परेश जोशी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आला.
पणजी-मळा येथील विन्सन अकादमी ऑफ फिल्म अॅण्ड मीडिया मध्ये पार पडलेल्या सोहळ्याला विन्सन वर्ल्डचे संजय शेट्ये,श्रीपाद शेट्ये,ज्ञानेश मोघे,उदय म्हांबरे,सिद्धेश म्हांबरे,सिनेमेटोग्राफर जगदीश  जोशी यांच्यासह दिग्दर्शक अक्षय इंडीकर आणि कलाकार निल देशमुख,रेखा ठाकुर,अनुश्री वाणी आदि उपस्थित होते.
मोघे यांनी चित्रपटाच्या निर्मिती मागची विन्सन वर्ल्डची भूमिका सांगून दिग्दर्शक इंडीकर यांचा परिचय करून दिला.इंडीकर यांनी चित्रपटाची पार्श्वभूमी सांगून वेगळा विषय नवीन कलाकार घेऊन हाताळायला मिळत असल्या बद्दल आनंद व्यक्त केला.
विन्सन वर्ल्डने यापूर्वी दिगंत या कोकणी सिनेमाची निर्मिती केली आहे.दिगंत या सिनेमाची निवड भारत सरकारने कान्स फेस्टिवहलसाठी पाठवल्या जाणाऱ्या चित्रपटांमध्ये केली होती.मोघे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.इफ्फी आणि मामी या प्रतिष्ठित फेस्टिव्हल साठी दिगंतची निवड झाली होती. गेली 11 वर्षे गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे यशस्वी आयोजन करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
स्थलपुराण मध्ये 8 वर्षीय मुलाची कथा आणि व्यथा मांडण्यात आली आहे. वडीलांसोबत सतत स्थलांतरामुळे मुलाच्या भाव विश्वावर झालेला परिणाम सिनेमात मांडण्यात आला आहे.आज पासून पेडणे तालुक्यात सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून 35 दिवस चित्रीकरण चालणार आहे.