विनयभंग पीडीतेच्या आईची ओळख जाहीर केल्या प्रकरणी प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षांविरोधात शिवसेनेची तक्रार दाखल 

0
1021
गोवाखबर:विनयभंग करण्यात आलेल्या मुलीच्या आईचे नाव जाहीर केल्याने शिवसेनेने काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांच्या विरोधात पणजी महिला पोलिसांकडे तक्रार केली आहे. प्रतिमा यांनी या मुलीच्या आईचे फोटो देखील व्हायरल केल्याचं या तक्रारीत म्हटले आहे. प्रतिमा यांच्याव्यतिरिक्त अन्य काही नेत्यांचीही या तक्रारीत नावे घेण्यात आली आहे. शिवसेनेच्या गोवा उपाध्यक्षा राखी प्रभूदेसाई- नाईक यांनी ही तक्रार नोंदवली आहे.काल सवेरा या स्वयंसेवी संस्थेच्या तारा केरकर यांनी कुतिंन्हो यांच्या विरोधात याच प्रकरणात तक्रार दाखल केली असून भाजप महिला मोर्चाने देखील तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
यासंदर्भात बोलताना नाईक म्हणाल्या,विनयभंग प्रकरणी संशयिताला स्थानिक पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी कोलवाळे येथील तूरुंगात केली आहे.याची कल्पना असून देखील अभिजीत देसाई यांनी प्रतिमा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले.प्रतिमा यांना याप्रकरणाची काहीच कल्पना नव्हती केवळ प्रसिद्धि झोतात राहण्यासाठी केलेला प्रकार त्यांच्या अंगलट आला आहे.
प्रतिमा आणि यांच्याव्यतिरिक्त दक्षिण गोवा महिला अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर व इतरांनी  प्रतिमा यांना पिडीत रहात असलेल्या गावामध्ये बोलावलं होतं. प्रतिमा यांनी पिडीत मुलीच्या आईची भेट घेतली. भेट झाल्यानंतर या सगळ्या नेत्यांच्या पिडीतेच्या आईसोबत फोटो काढला. हे फोटो आणि पिडीतेचं नाव प्रतिमा यांनी काही व्हॉटसअॅप ग्रुपवर व्हायरल केल्याचं राखी प्रभूदेसाई यांनी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. पिडीतेची ओळख गुप्त राखण कायद्याने बंधनकारक आहे, प्रतिमा यांनी पिडीतेच्या आईचं नाव आणि फोटो जगजाहीर केल्याने कायद्याचं भंग झाला असून दोषींविरोधात पोक्सो तसंच भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

भाजप महिला मोर्चाही तक्रार करणार

प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष  प्रतिमा कुतिन्हो यांच्या विरोधात  भाजप महिला मोर्चातर्फेदेखील पणजी येथील महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली जाणार असल्याचे मोर्चाच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत यांनी सांगितले. पीडित युवतीची ओळख सार्वजनिक करणे हा कुतिन्हो यांचा पब्लिसिटी स्टंट आहे. अशा प्रकारे पीडित युवतीची ओळख  सार्वजनिक करणे गुन्हा ठरत असल्याचेही त्यांनी  सांगितले.

कुतिन्होंविरुद्ध  तारा केरकर यांची तक्रार

दरम्यान प्रतिमा कुतिन्हो यांच्या विरोधात सवेरा ट्रस्टच्या तारा केरकर यांनी पणजी येथील महिला पोलिस स्थानकात सोमवारी तक्रार दाखल केली आहे.कुतिन्हो यांनी यापूर्वीदेखील अन्य एक पीडित युवती व तिच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर प्रसृत केले  होते. कुतिन्हो या पेशाने  वकील असल्याने पीडितेची माहिती सार्वजनिक करू नये, या कायद्यातील तरतुदीचे ज्ञान त्यांना असायला हवे, असे केरकर यांचे म्हणणे आहे.