विधानसभेच्या उपसभापतीपदी इजिदोर फर्नांडीस;उद्या होणार घोषणा

0
1194
गोवा खबर :उपसभापती असलेल्या मायकल लोबो यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्या नंतर रिक्त झालेल्या गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदी काणकोणचे आमदार इजिदोर फर्नाडिस यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे.
गोवा विधानसभेच्या उपसभापतीपदासाठी  भाजपातर्फे फर्नांडिस यांनी एकट्यानेच उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या नावाची घोषणा उद्या गुरुवारी (25 जुलै) होणार आहे.
अलीकडे 10 काँग्रेस आमदारांच्या पक्षांतरा नंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे  मायकल लोबो यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिला व ते मंत्री बनले. लोबो यांचा मंत्रीमंडळात समावेश झाल्या नंतर भाजपाने उपसभापतीपद स्वीकारण्यास  नीळकंठ हळर्णकर यांना सांगितले होते. मात्र हळर्णकर यांनी त्याला नकार दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर फर्नांडिस यांच्या नावाचा विचार झाला.फर्नांडिस यांनी उपसभापतीपद स्वीकारणे मान्य केले.
इजिदोर फर्नांडिस यांनी काही काळ मंत्री म्हणून काम केले होते. गोवा औद्योगिक विकास महामंडळाचेही ते एकदा चेअरमन झाले होते. फर्नांडिस यांना आता प्रथमच उपसभापतीपद प्राप्त झाले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेस किंवा इतर कुठल्याच पक्षाच्या आमदाराने उमेदवारी सादर केली नाही. यामुळे फर्नांडिस हे बिनविरोध निवडून आल्यात जमा आहे. सभापती राजेश पाटणेकर गुरुवारी त्यांच्या नावाची घोषणा करतील असे अपेक्षित आहे. उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यास बुधवारी (24 जुलै) मुदत होती.
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत आघाडी सरकारकडे एकूण 29 आमदारांचे संख्याबळ आहे. चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेत फक्त अकराजणच विरोधी बाकांवर आहेत. त्या अकरापैकी दोन जणांची भूमिका तटस्थच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांचीही काँग्रेसला साथ नाही. काँग्रेसमधील दहा आमदार अलिकडेच फुटून भाजपामध्ये आले आहेत. त्यामुळे प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार भक्कम बनले आहे. सभापतीपदासाठी यापूर्वी सुभाष शिरोडकर यांचे नाव भाजपाने विचारात घेतले होते पण शिरोडकर यांनी नकार दिल्याने  पाटणेकर यांची  सभापदी निवड झाली. नवे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना सरकार एका महामंडळाचेही चेअरमनपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.