विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर योग शिक्षणाची सक्ती करावी: श्रीपाद नाईक

0
562

 

गोवा खबर:हरएक खेळाडूला मैदानी खेळ खेळण्यासाठी मजबूत शरिरयष्टीची गरज असते. योगभ्यास केल्यास मानसिक व शारिरीकदृट्या खेळाडू मजबूत बनतो. शाळा व महाविद्यालयातील शारिरीक शिक्षकांनी क्रीडापटूं असलेल्या विद्यार्थ्यांचे कौशल्य ओळखून त्यांना खेळण्यास प्रोत्साहन द्यावे. राज्याच्या क्रीडा धोरणामुळे  विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांचा लाभ मिळत आहे.  यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर योग शिक्षणाची सक्ती करावी असे आवाहन केंद्रीयमंत्री नाईक यांनी केले.

कुजिरा-बांबोळी येथे गुरूवारी धेंपो कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय तसेच सरकारी महाविद्यालय-साखळी यांच्या संयुक्त विद्यामाने ‘ऑलिम्पिक डाऊन दी एजिस 2020’ हा भौतिक शिक्षण आणि संबद्ध विज्ञानावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,  गोवा विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. वरूण साहनी, धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, ऑलिम्पिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विरेन रास्कीना, धेंपो महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. राधिका नाईक, सरकारी साखळी महाविद्यालयाचे प्राचार्य जेर्वास्लो मेंडीस, कार्यकारी क्रीडा संचालक वसंत प्रभुदेसाई, गोवा विद्यापीठाचे मुख्य कार्यकारी शारिरीक प्रशिक्षक डॉ. प्रदीप देशमुख व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शारिरीक शिक्षणाची प्रत्येक माणसाला गरज आहे. शारिरीक शिक्षणातून आरोग्य सांभाळण्यासाठी लोकांना मोठा लाभ होतो. तसेच शिस्तपालनाचे धडेही शारिरीक शिक्षणातून मिळतात. योगा हा भारतीय क्रीडा प्रकार असून जागतिक पातळीवर योग 21 जूनच्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’मूळे परिचित आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकासारख्या देशातील लोकांनी योगाचा प्रकार आत्मसात केलेला आहे, असे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  म्हणाले, की गोवा हे खेळावर व खास करून फूटबॉलवर प्रेम असलेले राज्य आहे. आतापर्यंत राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील विकासासाठी बड्या उद्योजक कंपन्यानी हातभार लावलेला आहे. फुटबॉलमध्ये धेंपो समुह, चर्चील ब्रदर्स  आदीनी केलेले योगदान प्रशंसनीय आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी दर्जात्मक प्रशिक्षणाची गरज आहे.  आंतररष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्राचा चमकदार विकास करण्यासाठी सरकार  प्रयत्नशील आहे.राज्यातील प्राथिमिक शाळांपासून माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयांत शारिरीक शिक्षण आधीपासून सक्तीचे आहे. क्रीडा क्षेत्र हे सदृढ आरोग्याचा कणा आहे. नियमित खेळ खेळण्याबरोबर व्यायाम करीत असल्यामुळे आरोग्याला त्याचा मोठा लाभ होतो. आधूनिक  जीवनात प्रत्येकाने क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्याची गरज आहे. आधीच्या काळात आवड वा छंद म्हणून खेळाकडे बघितले जात होते. आता चांगल्या खेळाडूला रोजगाराची संधी मिळत आहे. अनेकांनी क्रीडा क्षेत्रातून उज्वल भवितव्य बनविलेले आहे. त्यामुळे पालकांनी मुलांमध्ये क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण करुन प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी परिषदेचे स्वागत करताना सांगितले की,  आरोग्य ही मोठी संपत्ती बनलेली आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दरदिवशी अर्धा-पाऊण तास शारिरीक शिक्षण घेणे सक्तीचे करण्याची गरज आहे. तसेच प्रत्येकाने क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्याबरोबर सदृढ आरोग्य ठेवण्यासाठी दैनंदिन व्यायामावर लक्ष केंद्रीत करावे .