विजय सरदेसाई : सर्व विरोधक एकत्र येणार

0
561
गोवा खबर : सद्याच्या महामारीच्या काळातही स्वतःच्या स्वार्थासाठी सामान्य लोकांशी प्रतारणा करणाऱ्या या सरकारला सर्व विरोधकांना एकत्र करून या अधिवेशनात उघडे पाडू असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
या महामारीच्या काळात सरकार लोकांच्या मदतीला धावून येण्याऐवजी स्वतःच्या स्वार्थ साधण्यात मग्न होता. लोकांच्या प्रखर विरोधानंतर  या सरकारने आपली लोकविरोधी कारस्थाने रद्द केली. या सरकारने म्हादई विकली,  कोळशाची वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी तीन प्रकल्पांना हे सरकार पाठिंबा देत आहे. ओल्ड गोवा ग्रेटर पणजी पीडीएत सामील करणे, गोव्यात गांजाची लागवड करणे हे निर्णय तसेच शेळ मेळावली आयआयटी प्रकल्प आणि नगरपालिका अधिसूचना या सरकारने लोकविरोधामुळेच रद्द केला असे त्यांनी म्हटले आहे.
असे जरी असले तरी हे सरकार पैशाच्या हव्यासापोटी अनेक लफडी करू पाहत असून लोकांनी त्यासाठी दक्ष राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. या अधिवेशनात आपण लोकायुक्त संस्था अधिक सुदृढ करण्यासाठी  बिल सादर केले असून याच लोकयुक्तामुळे  कामगारगेट,  किनारपट्टी सफाई अशी अनेक सरकारची भ्रष्टाचारी प्रकरणे उघडकिस आली असा दावा करून हे सरकार सध्या ही लोकायुक्त  संस्थाच कमकुवत करू पाहत असल्याचा आरोप केला.
गोव्यातील खासगी आस्थापनात 80 टक्के गोमंतकीयांना रोजगार हे खासगी विधेयक आपण मांडले असून राष्ट्रीय शिक्षण धोरण, घर बांधणी भत्ता, लोहिया मैदान सौंदर्यीकरण तसेच अन्य लोकविरोधी निर्णयाविरुद्ध इतर विरोधकांच्या साहाय्याने सरकारला घेरू असे त्यांनी म्हटले. ऊस उत्पादक, स्वातंत्र्य सैनिक, मोटारसायकल पायलट, स्थानिक टॅक्सी चालक, कोविड योद्धे यांच्यावर होत असलेल्या अन्याया विरोधातही आवाज उठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.