विकास व पर्यावरणासाठी एकात्मिक दृष्टीकोन बाळगण्याची गरज: नितीन गडकरी

0
986

गोवाखबर:पर्यावरण व पर्यावरणशास्त्र हे आमच्यासाठी उच्च प्राधान्य क्रमावर आहे. परंतु त्याचसोबत गरीब व्यक्तीचा देखील विचार आम्हाला करणे आवश्यक वाटते. पर्यावरणाची काळजी घेऊन रोजगार निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे; त्यासाठी गोव्यातील सर्व समाज भागीदारांनी एकत्रित येऊन विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, नौकानयन व जलस्रोत तसेच गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी यांनी आज वास्को येथे केले.

 

येथील बायना समुद्र किनारी उभ्या केलेल्या नव्या जेटटी व फेरी बोट सेवेचे औपचारिक उद्घाटन आज नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

 

भारताला सुमारे सात हजार किलोमीटर इतका समुद्र किनारा लाभला आहे. यांचा विकास करून पर्यटन वाढू शकते. गोवा राज्य पर्यटन राज्य म्हणून उदयाला आले ते या समुद्र किनाऱ्यांमुळेच. या क्षेत्रात भांडवल गुंतवणूक होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यास मदत होते, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. गरिबी, भूक, बेरोजगारी ही देशासमोरची मोठी आव्हाने असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जलमार्गांचा वापर हा आर्थिकदृष्ट्या परवडणारा, पर्यावरणपूरक असा आहे; त्यामुळे त्यांचा अधिक वापर करून गोव्याच्या पर्यटन विकासात त्याचा सहभाग अपरिहार्य आहे, असा विचार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. जलमार्गाद्वारे प्रवास केल्यास पर्यटक प्रवासाचा आनंद घेऊ शकतील, वेळ व पैसा वाचू शकतो तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडी सह प्रदूषण देखील टाळता येईल, ही गोष्ट गडकरी यांनी लक्षात आणून दिली.

 

आज इंधन आयातीसाठी देशाचा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो, तो देखील कमी करण्यासाठी इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, इलेक्ट्रिक गाड्या, बस यांच्या वापराचा मी आग्रह धरत आहे, असे गडकरी यांनी सांगितले. जालमार्गामध्ये वापरल्या जाणाऱ्या जहाजांमध्येही अशा पर्यावरणपूरक इंधनांचा वापर सुरु केला आहे.

कचऱ्याचे संपत्तीमध्ये रूपांतरण; तसेच ज्ञानाचे संपत्तीमध्ये रूपांतरण करणे, हे देशाचे भविष्य आहे. नैतिकता, पर्यावरण व पर्यावरणशास्त्र यांचे रक्षण करून रोजगार निर्मिती करणे, हे ध्येय असायला हवे, असे आवाहन गडकरी यांनी गोवा राज्याला केले. उत्पन्नाचा मार्ग बंद केल्यास काय विपरीत परिणाम होऊ शकतील, याचा विचार व्हायला हवा, असेही ते म्हणाले.

 

केंद्रीय पातळीवर गोवा राज्याला रस्ते विकासाठी आजपर्यंत १५ हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. तसेच मांडवी नदीवरील पुल तसेच रिंग रोडच्या बांधकामातील पन्नास टक्के खर्चाची जबाबदारी उचलून अनुक्रमे चारशे कोटी व पन्नास कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

 

भविष्याचा विचार करून गोव्यातील सर्व हॉटेल तसेच नवे विमानतळ देखील जलमार्गाने जोडावेत, अशी कल्पना गडकरी यांनी सर्वांसमोर मांडली. भविष्यात गोवा राज्य ‘क्रुझ डेस्टीनेशन’ म्हणून उदयाला यावे, यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असे देखील गडकरी यांनी सांगितले.

 

‘सागरमाला’ प्रकल्पाअंतर्गत सागरी विकासासाठी आवश्यक सर्व निधी केंद्राकडून गोवा राज्याला मिळेल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. राज्यातील सर्व संवेदनशील मुद्द्यांवर विचार करून एकत्रित येऊन निर्णय घेतल्यास गोव्याचा विकासही होईल, पर्यावरणाला हानी पोहचणार नाही व लोकांना रोजगारही मिळेल; यासाठी राजकीय नेतृत्व, प्रशासन, जनता, सामाजिक संस्था, माध्यमे या सर्वांनी एका दिशेने विचार करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.

 

याप्रसंगी केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, राज्यसभा खासदार विनय तेंडूलकर, गोव्याचे नगर विकासमंत्री फ्रान्सिस डिसुझा,  मुरगांव पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष आय. जेयाकुमार उपस्थित होते.