विकास प्रक्रियेत लोक सहभागाचे आयुष मंत्र्याकडून आवाहन

0
658

गोवा खबर:केंद्रिय आयुषमंत्री  श्रीपाद नाईक यानी विकास प्रक्रियेत लोकानी सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक कार्यासारखे कोणतेही कार्य हाती घेतल्यास लोकांच्या सहकार्याने आणि सहभागाने चांगले यश लाभते असे ते म्हणाले. मातृभूमी सेवा प्रतिष्ठानने सां पेद्रु जुने गोवे येथे आयोजित केलेल्या चष्मा वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

आयुष्य मंत्रालयाने राज्यात आयोजित केलेली नॅच्युरोपॅथीची शिबीरे यशस्वी ठरल्याचे सांगून अधिकाधिक ५० हजार लोकाना त्याचा फायदा झाल्याचे  श्रीपाद नाईक यानी सांगितले. त्यानी या शिबीरांचा लाभ घेण्याचे आणि सदर शिबीराच्या लाभाची इतराना माहिती देँण्याचे आवाहन लोकाना केले.

मानव सेवेचा एक भाग म्हणून मातृभूमी सेवा प्रतिष्ठानने राज्यातील विविध भागात मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबीरांचे आयोजन केले होते. या शिबीरांत एकूण ९७८२ लोकानी भाग घेतला. सुमारे ६५१३ लोकाना त्याचा फायदा झाला.

आमदार तथा पीडीएचे अध्यक्ष  फ्रांसिस्को सिल्वेरा यानी आपल्या भाषणात समाजकल्याणासाठी करीत असलेल्या कार्याबद्दल केंद्रिय आयुषमंत्री  श्रीपाद नाईक यांची प्रशंसा केली.

प्रसाद नेत्रालय उडुपीचे वैद्यकिय संचालक डाँ. कृष्णा प्रसाद कुडलु यानी यावेळी बोलताना गेली कित्येक वर्षे आपण आयुषमंत्र्यासोबत असल्याबद्दल आणि समाजसेवेची संधी उपलब्ध झाल्याबद्दल  आनंद व्यक्त केला. प्रसाद नेत्रालयाखाली सुमारे ५८३ व्यक्तींची तपासणी केली आणि ३५४ जणाना चष्मे वितरीत करण्यात आले आणि २६ जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

प्रा. रामाराव वाघ आणि एसिलोर संस्थेचे कार्यकारी संचालक  धर्मा प्रसाद राय यांची यावेळी भाषणे झाली.

एमएसपीचे सरचिटणीस  सुरज नाईक यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पंच सदस्य  भास्कर नाईक यानी आभार मानले.