वास्को येथे खासगी बसवाल्यांच्या  वाढीव दरा विरोधात आपची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार

0
184
गोवा खबर:आम आदमी पक्षातर्फे वास्को येथील खासगी बसवाल्यां कडून आकारल्या जात असलेल्या वाढीव दरा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 वास्को येथील खासगी बसवाल्यांनी आपली मनमानी चालविली असून प्रवाशांकडून बस प्रवासासाठी 50 टक्के जास्त आकारला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे,असा आपचा दावा आहे.
आपचे वास्को येथील शाखेचे समन्वयक परशुराम सोनुर्लेकर म्हणाले, आम्ही खासगी बसवाल्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. केटीसी – एमपीटी कॉलनी आणि केटीसी – बोगदा या मार्गांवर धावणाऱ्या बसगाड्यांच्या विरुद्ध ही तक्रार आहे. या मार्गावरील बसवाल्यांकडून प्रवाशांकडून तिकीट दरापेक्षा 50 टक्के जास्त दर आकारला जातो. प्रवाशांना कदंब बस स्थानकावर सोडले जात नाही आणि वास्को येथे 30 मिनिटांहून जास्त वेळ थांबून खोळंबा केला जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
बसवाल्यांकडून जास्त पैसे आकारले जात असल्याची तक्रार घेऊन स्थानिक रहिवासी आप  पक्षाच्या वास्को शाखेत आले होते. आम्ही हा विषय उपजिल्हाधिकाऱ्याकडे घेऊन जाण्याचे ठरविले असून यावर निर्णय अपेक्षित आहे. मोफत सार्वजनिक वाहतूक सोडूनच द्या, सरकार सर्वसाधारण पायाभूत वाहतूक सुविधा देण्यातच अपयशी ठरले आहे ,असा आरोप  सोनुर्लेकर यांनी केला आहे.