वास्को-बेळगावी दरम्यान नव्या पॅसेंजर रेल्वे सेवेची सुरुवात

0
776

 गोवा खबर:प्रवाशांची मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या वास्को-बेळगावी दरम्यानच्या पॅसेंजर रेल्वे सेवेला  हिरवा बावटा दाखविण्यात आला. केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते वास्को रेल्वे स्थानकामध्ये या सेवेचे लोकार्पण झाले.

याप्रसंगी श्रीपाद नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ही सेवा सुरु झाल्याचा अत्यंत आनंद आहे. या सेवेची आवश्यकता होती. गोवा आणि बेळगावचे वेगळे नाते आहे, व्यापारी संबंध आहेत. या सेवेमुळे आता प्रवाशांचे काम सोपे झाले आहे. काही काळानंतर आठवड्यातून दोनदा धावणारी ही पॅसेंजर रेल्वे दररोज सुरु करावीच लागेल. तसा प्रतिसाद या सेवेला नक्की मिळेल. दूधसागर धबधबा सारखी पर्यटन स्थाने पाहण्यासाठी ही गाडी उपयोगी ठरेल; अशा खूप अर्थांनी ही पॅसेंजर रेल्वे फायदेशीर आहे. ही रेल्वे सेवा सुरु केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कौतुक करून आभार मानले.

ब्रॉडगेजमुले बंद पडलेली आणि पावसामुळे उशीर झालेली ही रेल्वे सुरु करताना समाधान वाटत आहे, अशी भावना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी यावेळी व्यक्त केली. सुरक्षा व स्वच्छता आमच्यासाठी प्राधान्यक्रमावर असल्याचे अंगडी यांनी यावेळी नमूद केले. पर्यटन, सामाजिक संबंध, बेळगावच्या शेतकऱ्यांना उपलब्ध होणारी बाजारपेठ यासाठी ही रेल्वे महत्वाची असल्याचे ते म्हणाले. गोवा राज्यातील पर्यटन संधी पाहता येथे अधिकाधिक रेल्वे सेवा देण्याचा केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचाही मानस असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. देशाची अर्थव्यवस्था पर्यटनातून वृद्धिंगत करता येईल, असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. योगाने जगाला जोडले; तसे रेल्वे देशाला जोडण्याचे माध्यम बनली आहे, असेही ते म्हणाले. प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

बहुप्रतीक्षित अशी ही पॅसेंजर रेल्वे वास्को व बेळगावी शहरांना जोडणार आहे. फार कमी एक्स्प्रेस रेल्वे गाड्या या शहरांदरम्यान प्रवास करण्यासाठी उपलब्ध होत्या; शिवाय या गाड्या थांबण्याचा कालावधी देखील अत्यंत कमी होता. शिवाय दोन शहरांमधील भूप्रदेश पाहता वर्षभर रस्ते वाहतूक देखील उपलब्ध होत नव्हती. यामुळेच या दोन शहरांना जोडणाऱ्या रेल्वे सेवेची दीर्घकालीन,सतत व मोठी मागणी होत होती. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी या मागणीचा आढावा घेऊन नवी पॅसेंजर रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

ही पॅसेंजर रेल्वे आठवड्यातून दोन दिवस खानापूर, गुंजी, लोंडा, तिनाईघाट, कॅसल रॉक, कुलेम, संवेरदम, चांदर, मडगाव,कानसौलीम आणि दाबोळी येथे थांबे घेत प्रवास करणार आहे. एकूण १६८ किमीचा हा मार्ग आहे. महत्वाचे म्हणजे ब्रीगान्झा घाट व दूधसागर धबधबा अशा रमणीय भागातून ही रेल्वे जाणार आहे.

या पॅसेंजर रेल्वेमुळे दैनंदिन नाशवंत पण गरजेच्या भाजीपाला, फुले, दूग्धजन्य पदार्थ अशा गोष्टी गोव्यामध्ये येतील आणि गोव्यातील मत्स्योत्पादन, समुद्री अन्न खानपूर, बेळगावी मध्ये पोहचू शकेल. याशिवाय दोन राज्यातील या दोन शहरांमधील सांस्कृतिक व सामाजिक संबंध दृढ करण्यास ही सेवा आपली महत्वपूर्ण भूमिका बजावेल.

या पॅसेंजर रेल्वेचे क्रमांक ०६९२२/०६९२१ असे आहेत. यामध्ये एकूण १० बोगी आहेत ज्यापैकी ८ बोगी सामान्य दुसऱ्या वर्गाच्या आहेत तर २ बोगी सामानासह दुसऱ्या वर्गाच्या आहेत. वास्को स्थानकाहून दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी ही पॅसेंजर रेल्वे निघेल आणि रात्री ९ वाजून २५ मिनिटांन पॅसेंजर रेल्वे बेळगावी येथे पोहचेल. तसेच बेळगावी स्थानकाहून सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी ही पॅसेंजर रेल्वे निघून वास्कोला दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी पोहचेल.

दिनांक ६ सप्टेंबर रोजी वास्को येथून पहिल्यांदा ही पॅसेंजर रेल्वे आपला प्रवास सुरु करणार आहे. ६ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान प्रायोगिक तत्वावर ही पॅसेंजर रेल्वे दूधसागर धबधबा येथे थांबेल. या कालावधीत येणाऱ्या अनुभवावरून दूधसागर धबधबा येथील थांब्याची सेवा सुरु ठेवायची की नाही हे ठरविण्यात येणार आहे.