वास्कोत घरावर दरड कोसळून महिला ठार;मुलगा बचावला

0
216
गोवा खबर:वास्को येथील गोवा शिपयार्ड समोरील घरावर सोमवारी मध्यरात्री भली मोठी दरड कोसळून 65 वर्षाची महिला अनिता बोरकर ही ठार  झाली.तिच्या सोबत राहत असलेला तिचा मुलगा अजित मात्र बचावला.
सोमवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस सुरु असताना दरड कोसळून भले मोठे तीन दगड खाली आले. त्यातील एक दगड बोरकर यांच्या घरावर कोसळला.दरड कोसळत असल्याची चाहूल लागताच अजितने उठून आईला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला.
आसपासच्या लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी अजित आणि त्याच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यावेळी फक्त अजितच सापडला. लोकांनी त्याला बाहेर काढून त्याच्या आईचा शोध घेतला,मात्र ती सापडू शकली नाही.
अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेत मदत कार्य सुरु केले. तब्बल चार तास भला मोठा दगड आणि घरातील सामान हलवल्या नंतर पहाटे सव्वा तिनच्या सुमारास अग्निशामक दलाच्या जवानांना अनिताचा मृतदेह सापडला.त्यानंतर शवचिकित्साकरून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
ही दुर्घटना घडली तेथील भाग डोंगराळ असून अजुन मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी जोर धरु लागली आहे.