वसा दिवाळी अंक

0
1189

फॅसिझम आणि त्याची विविध रुपेयावरील लेखांसाठी अवश्य वाचा वसा

अंकाचे वैशिष्ट्य….
वैचारिक विरोध संपवणं हा कट्टरतावादाचा, फॅसिझमचा मुख्य कार्यक्रम असतो. कारण कट्टरतावादाला जे काही ध्येय साध्य करायचं असतं, राष्ट्राची धर्माधारित, वंशाधारित जी उभारणी करायची असते त्यात मुख्य अडथळा हा लोकशाहीवादी, सहिष्णुतावादी विरोधी विचारांचा असतो. सहिष्णुतावादी, लोकशाहीवादी अवकाश हा कट्टरतावाद आणि त्यांचं लक्ष्य यामध्ये बफर झोन म्हणून, एक ढाल म्हणून उभा असतो. एकदा का ही सहिष्णुतावादी, लोकशाहीवादी विचारांची ढाल मोडली, तो बफर झोन नष्ट केला की कट्टरतावाद आपल्या लक्ष्याला, मग तो एखादा विशिष्ट धर्म असेल किंवा वंश, त्याला विना अडथळा संपवू शकतो. हा वैचारिक विरोध संपवण्यासाठी आधी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं आणली जातात, इतिहासामध्ये ढवळाढवळ करुन नवा गाळीव इतिहास लोकांसमोर आणला जातो, प्रसार माध्यमं अंकित केली जातात आणि याचबरोबरीने वैचारिक विरोधकांच्या हत्याही केल्या जातात. गौरी लंकेश यांची हत्या हा देशात नव्याने वाढीस लागलेल्या कट्टरतावादाचा, फॅसिझमचा आणखी एक हिंसक उद्गार आहे. याआधीच्या कलबुर्गी, पानसरे, दाभोलकर या हत्या म्हणजे या हिंसक उद्गाराच्या आगमनाची मालिका होती तर त्याहीआधी झालेली गांधींजींची हत्या म्हणजे देशातील कट्टरतावादाच्या उदयाचा इशारा होता. फॅसिझम कधीच एकटा नसतो. त्याच्या आजूबाजूला त्याला पोषक अशा अनेक गोष्टी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पर्यावरणात घडत असतात. त्यामुळेच वेगवेगळ्या रुपात तो व्यक्त होतो. समाजाची भाषा अधिकाधिक विखारी होणं हे त्याचंच रुप आहे, तर भाषा विखारी होताना इतर अनेक बाबींमध्ये हतबलता येणं हाही त्याचाच आविष्कार आहे. कट्टरतावादाच्या या विविध रुपांचा आणि त्यामागच्या कारणांचा या विभागात वेध घेण्यात आला आहे. यामध्ये तज्ञ, पत्रकार, अभ्यासक तसंच विद्यार्थी यांच्या मतप्रवाहांना जागा देण्यात आली आहे.

संपादक – संध्या नरे पवार

लिहित आहेत – डॉ. श्रुती तांबे, प्रकाश बाळ, डॉ. विवेक कोरडे, उदय कुलकर्णी, सई पवार.
याखेरीज समाज, साहित्य, संस्कृती या प्रांतांतील घडामोडींचा मागोवा घेत आहेत – शर्मिष्ठा भोसले, राजा कांदळकर,शिल्पा शिवलकर, अलका गाडगीळ, राजा कांदळकर, शेखर देशमुख, उल्का महाजन, मुकूंद कुळे, संयोगिता ढमढेरे, तेजस हरड, दिपाली दोंदे.