वन खाते वन्य जीवनाच्या संरक्षणासाठी आणि लोकहितासाठी पूर्णपणे बांधिल:मुख्यमंत्री

0
809

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याहस्ते वन भवन इमारतीचे उद्घाटन

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यानी गोवा वन खाते वन्य जीवनाच्या संरक्षणासाठी आणि लोकहितासाठी पूर्णपणे बांधिल असून त्याव्दारे खात्याला कार्याच्या प्रत्येक बाबतीत लोकांभिमुख बनवित असल्याचे त्यानी सांगितले. आल्तिन पणजी येथे वन खात्यासाठी उभारण्यात आलेल्या नवीन वन भवन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.

      वन खात्याचा कार्यभार सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यानी वन्यजीव अभयारण्यात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या दुर्मिळ औषधी वनस्पतींच्या जतनासाठी प्रकल्प सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगितले. याबाबतीत औषधी वनस्पतीं काढणाऱ्यांची वन खात्यामार्फत नोंदणी करण्यात येणार असल्याचे त्यानी सांगितले त्यामुळे सक्षम वातावरणात त्याना आपला व्यवसाय करण्यास मदत होईल असे ते म्हणाले.

      पुढे बोलताना डॉ प्रमोद सावंत यानी वन्यजीव भागात अनेक पर्यावरणात्मक पदभ्रमण कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी वन खाते प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. हा कार्यक्रम सुरू करण्यासाठी वन खाते राज्यातील ट्रेकर्सची नोंदणी करण्यास सुरवात करणार असल्याचे ते म्हणाले.

      वन खात्याच्या या वन भवन इमारतीचे बांधकाम गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने केले आहे. या इमारतीत सौर पॅनलची सुविधा असून इमारतीसाठी आवश्यक असलेली ३० टक्के उर्जेची निर्मिती होते. वन भवनात विविध विभागांसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे.

      यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यानी वन भागात पेट्रोलिंगचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी वन खात्याने खरेदी केलेल्या २४ मोटरबाईकना बावटा दाखवून सुरवात केली. जैवविविधता मंडळाने प्रकाशित केलेल्या  जैवविविधता पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

      जीएसआयडीसीचे अध्यक्ष आणि आमदार जोशुआ डिसौझा यांचे यावेळी भाषण झाले. महापौर उदय मडकईकर, मुख्य सचिव परिमल राय, वन खात्याचे प्रधान सचिव पुनितकुमार गोयल, प्रधान मुख्य वनपाल सुभाष चंद्र व जीएसआयडीसी व वन खात्याचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.