गोल्डन ग्लोब रेसमधील नौदल कमांडर अभिलाष टॉमी यांची फ्रेंच जहाजाद्वारे सुखरूप सुटका

0
1956

गोवा खबर:भारतीय नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी देशी बनावटीच्या ‘थुरीया’ या जहाजातून जागतिक गोल्डन ग्लोब स्पर्धा, जीजीआर 2018 मध्ये सहभागी झाले होते. मात्र 21 सप्टेंबरला त्यांचे जहाज फुटल्यामुळे त्यांच्या पाठिला मोठी दुखापत झाली होती. त्यानंतर टॉमी यांनी सुटकेसाठी संदेश पाठवला होता.

आज सकाळी भारतीय वेळेनुसार 11.30 वाजताच्या दरम्यान फ्रान्सचे मासेमारी जहाज, ओसिरीसने त्यांना प्रतिसाद दिला. ओसिरीसच्या जहाजावरील चमुने अभिलाष यांची सुखरुप सुटका केली आहे. अभिलाष शुद्धीवर आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. सध्या ते ओसिरीस जहाजावर आहेत. ओसिरीस जहाज सध्या हॅनले या आणखी एका बोटीवरच्या खलाशांच्या सुटकेसाठी मार्गस्थ झाले आहे. भारतीय नौदलाचे जहाज सातपुडा देखील अभिलाष यांना परत आणण्यासाठी रवाना झाले असून इल ॲमस्टरडॅम या बेटावरुन अभिलाष टॉमी यांना ओसिरीसवरुन सातपुडा जहाजावर आणले जाईल.

अभिलाष यांची मदत आणि सुटका केल्याबद्दल भारताने ऑस्ट्रेलियन नौदल आणि ओसिरीस जहाजावरच्या चमुचे आभार मानले.