लोकायुक्तांकडुन भ्रष्टाचाराची २१ प्रमाणपत्रे मिळालेल्या मुख्यमंत्र्यांकडुन आता आरोग्यमंत्र्यांना “भ्रष्ट व फटींग” असल्याचे प्रमाणपत्र : गिरीश चोडणकर

0
115
गोवा खबर : भाजप सरकारचा प्रशासनावरील ताबा गेलेला असताना आता मानसिक संतुलनही बिघडले आहे. गोवा लोकायुक्तांकडुन भ्रष्टाचाराची २१ प्रमाणपत्रे घेतल्यानंतर भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता आपल्याच आरोग्यमंत्र्यांना “भ्रष्ट व फटींग” असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे अशी बोचरी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
भाजप सरकारची आता बेजबाबदारपणा, असंवेदनशीलता, भ्रष्टाचार व नाकर्तेपणा यांची प्रमाणपत्रे मिळवीण्याची प्रक्रिया सुरू झाली असुन, कोविडच्या प्रोफेलेक्सीस इलाजासाठी आयव्हरमेक्टिन गोळ्यांची खरेदी सरकारने केलीच नव्हती असे जाहिरपणे सांगुन मुख्यमंत्र्यांनी आपल्याच सरकारचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना भ्रष्ट व खोटारडा ठरविले आहे असा दावा गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
पुढिल आठ महिन्यात मुख्यमंत्री भाजप सरकारच्या मंत्रीमंडळातील उर्वरीत दहा मंत्र्यांना अशीच प्रमाणपत्रे देऊन, शेवटी स्वताला गोव्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट, अकार्यक्षम, बेजबाबदार, असंवेदनशील व सदोष मुख्यमंत्री म्हणुन डॉ. प्रमोद सावंत प्रमाणपत्र घेतील व लोकांकडुन पराभव स्विकारुन घरी जातील असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.
विश्वजीत राणे यांनी १० मे २०२१ रोजी आपल्या अधिकृत ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यांच्या पाठींब्याने आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा वापर १८ वर्षांवरील लोकांसाठी कोविडच्या प्रोफिलेक्सीस इलाजासाठी ताबडतोब करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विश्वजीत राणे यांनी १७ मे २०२१ रोजी परत एकदा ट्विट करुन महिला व बाल कल्याण खात्याचे कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांच्याकडुन पुढील ४८ तासात म्हणजे १९ मे २०२१ पासुन सदर गोळ्यांचे वितरण करण्यात येणार असल्याचे जाहिर केले होते याकडे गिरीश चोडणकर यांनी लक्ष वेधले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता जवळ जवळ एका महिन्यानंतर प्रोफिलेक्सीस इलाजासाठी सदर आयव्हरमेक्टिन गोळ्यांची सरकारने खरेदीच केली नव्हती असे सांगुन आपल्या मंत्रीमंडळातील मंत्री विश्वासास पात्र नसल्याचे कबुल केले आहे व जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असेच सुचविले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना यापुढे लोकांची दिशाभूल करणे थांबविण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी  गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
सदर आयव्हेरमेक्टिन गोळ्यांच्या खरेदीत २२ कोटी ५० लाखांचा घोटाळा झाल्याच्या आरोपावर आम्ही ठाम असुन, सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहीजे अशी आमची मागणी आहे. सदर गोळ्यांचा वापर करण्याचा सल्ला सरकारला देश-विदेशातील कुठल्या तज्ञानी दिला होता त्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
कॉंग्रेस पक्षाने  सदर गोळ्यांच्या खरेदीतील  २२ कोटी ५० लाखाचा भ्रष्टाचार उघड केल्यानंतर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ट्विट करुन मला “ज्ञान नसलेला शिक्षक” म्हणुन हिणवीले होते. माझ्या आयुष्यात ‘शिक्षक’ तसेच ‘राजकारणी’ म्हणुन काम करताना मी नेहमीच सत्य, प्रामाणिकता व निष्ठा जपली आहे. विश्वजीत राणे सारखे गोलमाल व घोटाळे करण्याचे ज्ञान मात्र मी कधीच घेतले नाही व घेणार नाही  असा जोरदार पलटवार गिरीश चोडणकर यांनी आज आरोग्यमंत्र्यांवर केला आहे.
आजाराचा बाजार करुन आपली तिजोरी भरण्यासाठी वैद्यकीय चाचणी न करता जबरदस्तीने लोकांना आयव्हरमेक्टिन गोळ्या देण्याचा प्रयत्न कॉंग्रेस पक्षाने हाणुन पाडला व हजारो गोमंतकीयांच्या जीवावरील धोका टाळण्याचे काम केले,  हे गोवा राज्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे व माझे योगदान काय असा प्रश्न विचारणाऱ्या आरोग्यमंत्री विश्वजीत राणेना आता कळले असेल असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.