लोकांमध्ये सुरक्षेची भावना व आत्मविश्वास जागृत करणे सरकारचे कर्तव्य : दिगंबर कामत

0
747

 गोवा खबर: मडगावातील दिवसा ढवळ्या झालेल्या खुनाचा तपास पूढे जात असताना, राज्यातील जनतेमध्ये सुरक्षेची भावना व आत्मविश्वास जागृत करण्यासाठी सरकारने पाऊले उचलणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी त्वरित याची दखल घेवुन कार्यवाही करणे गरजेचे आहे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

मडगाव शहरात सिसिटीव्ही कॅमेरे पुर्नकार्यांवित करणे गरजेचे आहे. सरकारने संपुर्ण राज्यात देखरेख ठेवण्यासाठी अशी यंत्रणा कार्यांवित करणे गरजेचे आहे. सरकारने अनावश्यक खर्चाला आळा घालुन जनतेच्या सुरक्षेसाठी त्वरित कृती करणे गरजेचे आहे. पोलीस खात्यातील रिकाम्या जागा भरुन पोलीस यंत्रणेला बळ देणे गरजेचे आहे,असे कामत म्हणाले.

मडगाव शहरातील सिसिटीव्ही कॅमेरे काॅंग्रेसचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांच्या यापुर्वीच्या कारकिर्दीत खासदार निधीतुन बसविले होते,असे सांगून कामत म्हणाले, त्याच प्रमाणे काॅंग्रेसचे तत्कालीन राज्यसभा खासदार स्व. शांताराम नाईक यांनी फातोर्डा भागात सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी खासदार निधीतुन रक्कम मंजुर केली होती. परंतु २०१२ नंतर आलेल्या भाजप सरकारला मडगावच्या कॅमेऱ्यांची देखभाल करणे जमले नाही तर फातोर्डातील कॅमेऱ्यांचा प्रस्ताव कागदोपत्रीच अडकला.

मडगाव खुनातील दोन आरोपीना पोलिसांनी पकडले व तिसरा शरण आला असला तरी या खुनाच्या मूळाशी जाणे व खुनाचा हेतू कोणता होता व त्यामागे खरा सुत्रधार कोण हे शोधुन काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे,असे कामत म्हणाले.

कामत म्हणाले,सरकारने पोलिस यंत्रणेमार्फत संपुर्ण राज्यात लोकांच्या मनात सुरक्षा व्यवस्थेबद्दल आत्मविश्वास जागृत करणे महत्वाचे आहे. संपुर्ण राज्यात दिवस- रात्र पोलिस गस्त घालणे सुरू करावे तसेच राज्याच्या सीमेवर चोख बंदोबस्त व तपासणी हातात घेऊन, प्रवेश करणारे व बाहेर जाणारे यांवर कडक नजर ठेवणे महत्वाचे आहे.

पोलिसांनी बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्यांवर त्वरित कारवाई करुन, सदर शस्रे जप्त करावीत. मडगावातील खुनाच्या घटनेने संपुर्ण राज्यात भितीची छाया पसरली आहे याकडे कामत यांनी लक्ष वेधले.

देशात कोसळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे अनेक व्यवसाय-धंदे बंद पडल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे बेकारीची समस्या उद्भवणार आहे. त्याचा परिणाम गुन्हेगारी वाढण्यावर होऊ शकतो. सरकारने अशी परिस्थीती येण्यापुर्वीच योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे,अशी मागणी कामत यांनी केली आहे.