लोकांच्या आशीर्वादामुळेच मी चार वेळा निवडून आलो : श्रीपाद नाईक

0
814

 

 

गोवा खबर:केंद्रात मोदी सरकारने वेगवेगळ्या योजना तयार करून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या आणि सामान्य माणूस स्वतःच्या पायांवर कसा उभा राहील याचा विचार केला. ते प्रधानमंत्री म्हणून सत्तेत आल्यापासून प्रधानमंत्री कार्यालय असो वा कुणा मंत्र्याने भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत नाही. त्यांनी देशातील भ्रष्टाचार संपवला. तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी जगात भारताला एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. त्यापूर्वी भारताकडे गरीबांचा देश, रोग्यांचा देश अशा दृष्टीने पहिले जायचे. पण आज परिस्थिती वेगळी आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीपाद नाईक यांनी ताळगांव येथील प्रचार सभेत बोलताना केले.

ताळगांव मतदारसंघात श्रीपाद नाईक यांचा प्रचार दौरा पार पडला, त्यावेळी उपस्थितांना उद्देशून ते बोलत होते. विकास, राष्ट्राची सुरक्षा, सामान्यांना सोबत घेऊन जाण्याचा विचार हेच भाजपचे कार्य आहे. तेच कार्य पुढे नेण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. माझे कार्य लोकाभिमुख असल्याने गेल्या चार निवडणुकांमध्ये लोकांनी आपला आशीर्वाद मला दिला आहे. कार्यकर्त्यांनी घाम गाळला आहे, त्यामुळेच मी निवडून आलेलो आहे. यावेळीही लोक माझ्या कामाचा नक्कीच विचार करतील अशी अपेक्षा असल्याचे पुढे बोलताना श्री नाईक म्हणाले.

 

यावेळी भाजपचे दत्तप्रसाद नाईक यांचेही भाषण झाले. याप्रसंगी युवा मोर्चा अध्यक्ष प्रमय माईणकर, नगरसेविका शीतल नाईक, किशोर शास्त्री व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.