लोकांचा संयम सुटण्यापुर्वी अर्थव्यवस्था व कोविडवर श्वेतपत्रीका जारी करा :विरोधीपक्ष नेते कामत यांची मागणी

0
243
गोवा खबर: मागच्या दहा दिवसात जागतीक पातळीवर इंधनाचे दर कमी झालेले असतानाही गोव्यात पेट्रोलचे दर  ५ रुपये ४७ पैसे व डिजेलचे दर  ५ रुपये ८० पैशांनी वाढवुन सरकारने सामान्य माणसाचे कंबरडेच मोडण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने ताबडतोब इंधन दरवाढ मागे घ्यावी. लोकांप्रती सरकारची असंवेदनशीलता चालुच राहिल्यास जनता रस्त्यावर येण्यास मागेपुढे पाहणार नाही याचे भान सरकारने ठेवावे, असा इशारा विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी दिला आहे. 
कोविड संकट काळात लोकांना आर्थिक मदतीची गरज आहे. कोविड महामारीमुळे जाहिर झालेल्या लाॅकडाऊन नंतर सामान्य माणसाला त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. आज अनेक व्यवसाय बंद असुन, अनेकांना नोकऱ्यांवरुन काढुन टाकण्यात आले आहे तर हजारो लोकांचे पगार कापण्यात आले आहेत. लोक सरकारकडुन मदतीची अपेक्षा करीत असताना, भाजप सरकार नेमके उलटी कृती करुन जनतेलाच त्रास देत आहे,असा आरोप कामत यांनी केला आहे.
कामत म्हणाले, गोव्याच्या अर्थव्यवस्थेची सद्य परिस्थीती व कोविड संबंधी सरकारने श्वेत पत्रिका  जारी करावी अशी मागणी काॅंग्रेस व इतर सर्व विरोधी पक्ष करीत आहेत. अनेक वेळा मागणी करुनही सरकार त्याकडे कानाडोळा करीत आहे. सरकारने सत्य परिस्थीती जनतेसमोर न ठेवल्यास लोकांचा संयम सुटेल व त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थीतीला सर्वस्वी भाजप सरकार जबाबदार राहिल.
सन २०१६ मध्ये गोव्यात पेट्रोलचे दर  ६० रूपयांच्यावर जाणार नाहित अशी घोषणा भाजपच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यानी केली होती त्याची आठवण करुन देत, सदर घोषणा निवडणुकीसाठीचा जुमला होता का असा प्रश्न विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी विचारला आहे.