लोकांचा ढवळीकरांवरील विश्वास उडाला:उपमुख्यमंत्री आजगावकर

0
661
गोवा खबर:मगो पक्ष हा भाऊसाहेबांचा बहुजनांचा पक्ष आहे मात्र ढवळीकर बंधूंनी त्याला आता ढवळीकरवादी पक्ष बनवला आहे.लोकांचा ढवळीकरां वरील विश्वास उडाला आहे.ढवळीकर बंधूंनी मगोची वाट लावली त्यामुळे लोक योग्य तो निर्णय घेऊन त्यांना जागा दाखवतील असे मत उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी व्यक्त केले आहे.

उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्या नंतर नवीन जबाबदारी तसेच बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाबू आजगावकर यांच्याशी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे.
प्रश्न:उपमुख्यमंत्री बनल्या नंतर तुमच्यावरील जबाबदारी आणि लोकांची तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत,त्याचा सामना कसा करणार?
आजगावकर:लोकांची साथ मला नेहमीच मिळत आलेली आहे.खालच्या लेवल पासून या लेवल पर्यंत पोचलेलो आहे.मी 2 वेळा नगरसेवक,मग आमदार झालो,मंत्री झालो.चार वेळा निवडून आलो आणि 5 वेळा मंत्री झालो.त्यामुळे नवीन जबाबदारी अवघड जाणार नाही.
प्रश्न: तुमच्या राजकीय वाटचालीत अनेक राजकीय उलथापालथ पहायला मिळते त्याचे कारण काय?
आजगावकर:मी केव्हाच कुठल सरकार पाडलेल नाही.नेहमीच सरकार टिकवण्याची भूमिका घेतलेली आहे.सरकार पडल्या नंतर आम्ही बंड केलेला आहे.यावेळी मी मगो मध्ये प्रवेश करून मगो मधून निवडून आलो.मंत्री झालो.जेव्हा मी या सरकार मध्ये मंत्री झाली तेव्हा मी अगोदरच ढवळीकर यांना स्पष्टपणे सांगितले होते,आता हे सरकार पाडायचे नाही.हे सरकार टिकवण्यासाठी मी आहे.सगळ काही चांगल चालत असताना सुदिन ढवळीकर यांनी आपल्या भावाला शिरोडयात उभा करून सगळ डिस्टर्ब केल.मी त्यांना हा निर्णय चुकीचा आहे हे दाखवून दिले मात्र अध्यक्ष आणि सुदिन आपल्याला हवे तसे निर्णय घेतात.आमचे काही ऐकून घेत नाहीत.मगो पक्ष हा बहुजनांचा पक्ष,सगळ्या विचाराच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणून आम्ही मगो मध्ये गेलो होतो.मात्र आमच काही ऐकूनच घेतले जात नाही.लवू मामलेदार यांनी आपला विचार मांडला त्यामुळे त्यांची पक्षातुन हकालपट्टी केली गेली.गुंड आणून मामलेदार यांच्या समोर मस्ती करून दाखवली. ढवळीकर बंधूंच्या मनमानी मुळे मगो पक्ष रसातळाला गेला आहे.मगो पक्ष आता फक्त ढवळीकर कुटुंबाची मालमत्ता बनली आहे.दोघे भाऊ आपल्या फायद्यासाठी काहीपण करण्यास तयार आहेत.जेव्हा मला समजल की हे दोघे सरकार पाडु इच्छित आहेत तेव्हा आम्ही मगो सोडून भाजपमध्ये गेलो.भाजपमध्ये त्यांनी मला उपमुख्यमंत्री आणि दीपक पाऊसकर यांना मंत्री करणार असे सांगितले होते.वाहतूक खाते मला देणार.जी खाती आणि जबाबदारी भाजपने दिली आहेत त्यांचा वापर मी गोव्यातील सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी करणार आहे.यावेळी मी जे पक्षांतर केलय ते शेवटचे पक्षांतर असणार आहे.आज मी गोव्याचा उपमुख्यमंत्री झालो तरी पेडण्यातील लोकांसाठी बाबूच राहणार आहे.
प्रश्न:शिरोडयात मगो पक्ष निवडणूक लढवत आहे,त्याचा भाजपवर काय परिणाम होईल?
आजगावकर:ढवळीकर कुटुंबीय आता काही बोलले तरी लोक त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाहीत.भाऊसाहेब बांदोडकर हे बहुजन,दलित आणि सर्वच लोकांना विश्वासात घेऊन त्यांचे विचार ऐकून काम करत होते.आता ढवळीकर भाऊ फक्त आपला विचार करून निर्णय घेतात.लोकांना आता ही गोष्ट समजली आहे.त्यामुळे लोक आता त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाहीत.मगो पक्ष तर त्यांनी रसातळाला नेलाय.त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली तरी त्यांच्या हाती काही लागणार नाही.
प्रश्न:भाजपकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत?
आजगावकर:1999 मध्ये मी जेव्हा काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलो तेव्हा भाजपने मला पहिल्यांदा मंत्री बनवल.माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यामुळे सध्याचे सरकार अस्तित्वात आले आहे.पर्रिकर यांनी केलेली विकास कामे आणि सामाजिक योजना घेऊन नव्या दमाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकार सांभाळत आहेत.त्यांनी माझ्या सारख्या दलित माणसाकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवले आहे. पर्रिकर यांनी घालून दिलेल्या मार्गावर पुढे जात गोवा नंबर वन करणे हे आमचे ध्येय असणार आहे.
प्रश्न:मगो पक्ष सोडून बरेच जण जात आहेत,काय आहे मगोचे भवितव्य?
आजगावकर:मगो पक्ष फक्त ढवळीकर भावांपुरता उरला आहे.त्यांना दोघांना मिळून सरकार बनवायच असत. ते बाकी कोणाला विश्वासातच घेत नाहीत.पक्ष कुठे बळकट होईल यासाठी त्यांनी काहीच केलेले नाही.लोकांना त्यांचे स्वार्थी राजकारण कळून चुकले आहे.त्यांनी माझ्या सारख्या दलित माणसाला अपमानास्पद वागणूक दिली.माजी आमदार लवू मामलेदार यांनी आपली मते मांडली म्हणून त्यांची हकालपट्टी केली.हे सगळे लोकांनी बघितले आहे.या दोघा भावांनी मगोची पूर्ण वाट लावली आहे.आता लोक योग्य तो निर्णय घेऊन यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत.