लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीत काॅंग्रेसची मते ६.३२ टक्के वाढली : गिरीश चोडणकर

0
151

 

गोवा खबर:भाजप सरकारला उतरती कळा लागली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गोमंतकीयांनी काॅंग्रेस पक्षाची मतांची टक्केवारी ६.३२ टक्के वाढवुन तसा स्पष्ट संदेश दिला आहे. काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी जनभावनेचा आदर करुन भ्रष्ट व असंवेदनशील भाजप सरकारचा २०२२ विधानसभा निवडणुकीत सपशेल पराभव करुन काॅंग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी कार्यरत  व्हावे, असे आवाहन काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. 

उत्तर गोवा जिल्हा काॅंग्रेसच्या विवीध गट अध्यक्षांच्या आयोजीत केलेल्या पहिल्या गटाच्या बैठकीत ते बोलत होते. भाजप मतविभागणी करण्यासाठी आता नविन राजकीय पक्ष व संघटना जन्मास घालणार आहे. गट समित्यांनी भाजपच्या धूर्त खेळीची लोकांना आताच जाणीव करुन द्यावी, असे  चोडणकर यांनी सांगीतले.
भाजपने अलोकशाही मार्गाने २०१७ मध्ये सत्ता काबीज केली. परंतु, जनतेने २०१९ मध्ये  भाजपच्या मतांची टक्केवारी २.२२ टक्के कमी करुन, भाजपला जनतेच्या नापसंतीचा योग्य संदेश दिला असे चोडणकर म्हणाले.
काॅंग्रेस पक्ष आज जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. खरी आकडेवारी व तथ्यांच्या आधारावरच सरकारच्या चुका दाखवित आहे. गोवा विधानसभा तसेच सार्वजनीक मंचावर जनतेचे विषय काॅंग्रेस पक्ष प्रभावीपणे मांडत असल्याचे काॅंग्रेस विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत यांनी यावेळी बोलताना सांगीतले. खरे-खोटे समजण्यासाठी गोमंतकीय जनता हुशार असुन, भाजपच्या उत्सवबाजीला व घोषणांना बळी न पडता गोमंतकीय जनता सत्याचीच साथ देणार असा विश्वास  कामत यांनी व्यक्त केला. सर्व गट अध्यक्षांनी शिस्तीने व पक्षाच्या धोरणांनुसार कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
काॅंग्रेसचे मांद्रे, डिचोली, पणजी, साखळी, वाळपई, मये, साळीगाव, म्हापसा, कुभांरजुवा, थिवी व पर्ये येथिल गट अध्यक्ष वा निमंत्रक या बैठकीस हजर होते.
सर्व गटाध्यक्षांना सदस्य नोंदणी मोहिम पुढे नेण्यासाठी आवश्यक पाऊले उचलण्यास सांगण्यात आले. आगामी काळात पक्षातर्फे आयोजित करण्यात येणारे विवीध कार्यक्रम यावर चर्चा करण्यात आली. प्रत्येक मतदारसंघात बुथ समिती निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले तसेच स्थानीक विषयांवर भर देण्याचा सल्ला देण्यात आला.
काॅंग्रेस पक्ष शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी गट पातळीवर आंदोलन उभारणार असुन त्यावर या बैठकीत चर्चा झाली तसेच गांधी जयंती व लालबहादुर शास्त्री जयंती  दिनी कार्यक्रम राबविण्यात येतील असे उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके यांनी सांगीतले.