लॉकडाउनच्या काळात सुरक्षित न्यायदानासाठी उच्च न्यायालयाच्या उपाययोजना

0
363

गोवा खबर:कोविड – १९ महामारीच्या काळात न्यायदानाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने विविध उपाययोजनांचा अवलंब केला आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या      महा-निबंधकांनी कळविले आहे. मुंबई उच्च न्यायालयातर्फे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून याचिकांवर काम केले जात आहे. घराच्या बाहेर न पडता न्यायप्रक्रियेत लोकांना सहभागी होता यावे यादृष्टीने  कार्यपद्धती विकसित करून त्याची चाचणी करण्याचे काम मुंबई येथील मुख्य खंडपीठात सुरू आहे. अशा प्रकारची कार्यपद्धती मुंबईसारख्या शहरात फार उपयुक्त ठरेल, जेथे सामाजिक अंतर राखताना प्रवास करणे शक्य नाही.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सुविधांच्या आधारे नागपूर, औरंगाबाद व गोवा येथील येथील खंडपीठांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा पुरविण्यात आली आहे. हीच प्रक्रिया महाराष्ट्र व गोव्यातील जिल्हा न्यायालयांमध्येही अवलंबली जात आहे. शक्य होईल तितकी प्रत्यक्ष उपस्थिती कमी करण्याच्या दृष्टीने यंत्रणा सुधारण्याचे काम सुरू आहे.  यामुळे सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही तातडीच्या याचिकांवर निवाडा देणे शक्य होईल. दीर्घकाळासाठी अशी सुविधा तयार करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा मानस आहे. या उपाययोजनांसाठी आवश्यक ते वित्त सहाय्य पुरविण्याची विनंती राज्य सरकारला करण्यात आली आहे.