लैंगिक गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी उचलावयाच्या आवश्यक त्या पावलांबाबत केंद्राचे राज्यांना निर्देश

0
1112

 गोवाखबर:महिला आणि मुलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी उचलावयाच्या पावलांबाबत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका संजय गांधी यांनी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. पत्रात नमूद केलेल्या काही उपाययोजना :-

  1. लैंगिक गुन्ह्यांच्या विविध पैलूंबाबत विशेषत: पुरावे गोळा करणे आणि जतन करण्याबाबत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात यावे.
  2. मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणात कायद्यातील विहित मुदतीत तपास पूर्ण होण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यांसाठी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश देता येऊ शकतील.
  3. अशा प्रकरणांमध्ये तपासात अडथळा आणणाऱ्या किंवा गुन्हेगारांशी संधान असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात राज्य सरकारांनी कठोर कारवाई करावी.
  4. वेळच्या वेळी, जलद व्यावसायिक पद्धतीने तपास केल्यास अशा प्रकरणी आरोपसिद्धी होऊ शकते. मात्र पोलिस विभाग हा राज्यांचा विषय असल्याने राज्येच याबाबत आवश्यक पावले उचलू शकतात. लैंगिक गुन्ह्यांसाठी विशेषत: मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांबाबत विशेष पथकाची स्थापना हे या संदर्भात महत्वाचे पाऊल ठरु शकते.

राज्यांमध्ये न्यायवैद्यक प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी राज्य सरकारांना मदत करण्याची तयारी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्र्यांनी दर्शवली आहे.

“पोक्सो” अंतर्गत ई-बॉक्सचा, हेल्पलाईन क्रमांक 1098 चा वापर करण्याबाबत मुलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची विनंती केंद्रीय महिला व बालविकास मंत्र्यांनी राज्यांना केली आहे. हिसांचाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी आतापर्यंत 175 वन स्टॉप सेंटर उभारण्यात आली आहेत,असेही त्यांनी नमूद केले आहे.

महिला आणि बालकांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी मनेका गांधी यांनी राज्य सरकारांकडून सूचना मागवल्या आहेत.