लेस्टरवरील हल्लाची न्यायालयीन चौकशी करा:शिवसेनेची मागणी

0
3426
गोवा खबर: फातोर्डा स्टेडियमवर झालेल्या आयएसएल सामन्यानंतर लेस्टर फर्नांडिस या तरुणावर झालेल्या निर्दयी हल्ल्याचे समर्थन करणारे जे निवेदन दक्षिण गोवा पोलिस  अधीक्षक  अरविंद गवस यांनी जारी केले आहे, त्यावरून गोव्यात अराजकता वाढत असल्याचेच दिसत आहे, असा आरोप करत लेस्टरवरील हल्ल्याची पोलिसांकरवी नाही तर न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी गोवा शिवसेनेच्या उपाध्यक्ष आणि प्रवक्त्या राखी प्रभुदेसाई नाईक यांनी केली आहे.
     लेस्टरने पोलिसाच्या श्रीमुखात मारल्याच्या सबबीखाली दहापेक्षाही अधिक पोलिसांनी फूटबॉल ग्राउंडवर त्याला मारहाण करणे ही शरमेची बाब आहे,असे सांगून नाईक म्हणाल्या, आम्हाला गवस यांना विचारावयाचे आहे, की एखाद्या व्यक्तीला नियंत्रणाखाली न आणताच मारहाण करण्याची तुम्हाला परवानगी आहे काय? इतक्या पोलिसांना एकटयाने तोंड देण्याची ताकद लेस्टरमधे आहे काय?
  नाईक म्हणाल्या, लेस्टरने खरोखरच पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशिलात मारली असेल तर त्याला पोलिस ठाण्यात नेऊन कामावरील सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याच्या अथवा अन्य कलमान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावयास हवा होता. कर्तव्यावरील पोलिसांसाठी कायद्यात पुरेशी संरक्षक कलमे आहेत. कायदा हातात घेण्याचा पोलिसांना अधिकार आहे काय? गृहमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अनुपस्थितीमुळे पोलिस दलात आणि संपूर्ण राज्यातही बजबजपुरी माजलेली आहे, असे या प्रकारावरून प्रतिबिंबित होत आहे. पर्रिकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा पोलिस दल गैरफायदा घेत आहे.
  लेस्टरवर हल्ला करणाऱ्या सगळया पोलिसांची योग्य रीतीने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करून नाईक म्हणाल्या, गवस आपल्या कर्मचाऱ्यांना पाठिशी घालतील याची आम्हाला कल्पना असल्यानेच चौकशी न्यायालयीन व्हायला हवी. या प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयीन चौकशी करावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. संबंधित पोलिसांना जर एका तरुणाला हाताळता येत नसेल तर त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे. कारण मोठा जमाव हाताळण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली तर ते काय करतील? लेस्टरवरील हल्ल्याचे प्रकरण दडपू दिले जाणार नाही. शिवसेना याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करील.
   हा विषय केवळ एकटया लेस्टरचा नाही तर पोलिसांशी नेहमी संबंध येणाऱ्या लाखो लोकांचा आहे. गवस यांच्या निवेदनामुळे पोलिस कर्मचारी आणखी हिंमतीने कायदा हाती घेतील. नुकतेच हणजुणे पोलिस ठाण्याच्या एका महिला कॉन्स्टेबलने महिला पोलिस निरीक्षकाच्या देखत भर रस्त्यावर एका व्यक्तीच्या थोबाडीत मारल्याचे आम्ही पाहिले आहे, याची आठवण करून देत नाईक म्हणाल्या, त्या महिला कॉन्स्टेबलवर तर कारवाई झाली नाहीच; पण ज्या व्यक्तीला मारण्यात आले त्याच्यावर कर्तव्यावरील सरकारी कर्मच्याऱ्याच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला.
  गोव्याची कायदा आणि सुव्यवस्थेवरील पकड ढिली होत चालली असल्याचा आरोप करून नाईक म्हणाल्या, कायदा व सुव्यवस्था राखणारेच त्याचे उल्लंघन करीत आहेत. पोलिसांकरवी होणाऱ्या चौकशीवर आमचा विश्वास नसल्याने लेस्टरवरील हल्ल्याची न्यायालयीन चौकशीच केली जावी, अशी मागणी शिवसेना  करीत आहे.