लेखाधिकाऱ्यांच्या त्या निकालाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा:शिवसेना

0
1314

गोवा खबर:लेखाधिकाऱ्यांच्या परीक्षेच्या निकालाची न्यायालयीन  चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेतर्फे उपाध्यक्ष तथा प्रवक्ता राखी प्रभुदेसाई नाईक यांनी केली आहे.

जानेवारी महिन्यात झालेल्या लेखाधिकाऱ्यांच्या 80 जागांसाठी  ८ हजार अर्जदारांनी परीक्षा दिली होती. नुकताच त्याचा निकाल जाहीर झाला असून सर्वच्या सर्व 8 हजार उमेदवार त्यात नापास झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.या परीक्षेच्या विचित्र निकालाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांद्वारे व्हावी,अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
 ही निवडप्रक्रिया पूर्णपणे संशयित आहे,  इतक्या कमी दर्जाचे पदवीधर गोव्यात आहे असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेला दोष देणे हे चुकीचे आहे कारण आजपर्यंत आपण खूप विद्वान पदवीधर गोव्याने निर्माण केले आहेत आणि त्यात वाणिज्य शाखेचे पदवीधरसुद्धा आहेत.त्यामुके उच्य न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी झाल्यास, इतक्या मोठ्या प्रमाणावर नापास झालेल्या उमेदवारांमागचे सत्य कळेल,अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली आहे.
 परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तटस्थ आणि सक्षम व्यक्तींकडून फेरतपासणी व्हावी,अशी मागणी करून नाईक म्हणतात, लेखा विभागाच्या संचालकांनी कोणत्या व्यक्तींकडून या पेपर्सची तपासणी झाली, त्यांची नावे जाहीर करायला हवीत.  इथल्या तरुणांची ज्यांना सरकारी नोकरीत रुजू होण्याची इच्छा आहे त्यांची हि चेष्टा नाही का  ? असा संतप्त सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे.
अशा प्रकारच्या निकालामुळे त्या तरुणांचा भविष्यात कोणत्याही परीक्षेस सामोरे जाण्याचा आत्मविश्वास संपून जाईल याचा विचार राज्य सरकारने करायलाच हवा,असे स्पष्ट करून नाईक  यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षार्थींना नापास करण्यामागे कोणता राजकीय नेता, अधिकारी किंवा कोणता राजकीय डाव असण्याची शक्यता वर्तवली आहे.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर सध्या अधिकारीस्तरावर काम करणाऱ्यांची बौद्धिक क्षमता पडताळण्यासाठी एक परीक्षा का होऊ नये ,असा प्रश्न उपस्थित करत यापुढे  सर्व खात्यांतील नोकरभरतीच्या प्रक्रिया पारदर्शक असावी. प्रत्येक उमेदवाराला त्याला नाकारले गेल्याचे कारण आणि त्याची उत्तरपत्रिका संबंधित खात्याच्या वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावी,अशी  मागणी शिवसेनेने केली आहे.
लेखाधिकाऱ्यांच्या 80 पदांसाठीच्या परीक्षेत सर्व 8 हजार उमेदवार फेल
 सरकारने लेखाधिका-यांच्या (अकाऊटंट्स) 80 पदांसाठी जानेवारी महिन्यात घेतलेल्या  लेखी  परीक्षेत सगळेच्या सगळे म्हणजे 8 हजार उमेदवार नापास झाले आहेत. लेखा खात्याच्या संचालकांनी अधिसूचनेद्वारे मंगळवारी हा निकाल जाहीर केला.
 नोव्हेंबर 2017 मध्ये लेखाधिका-यांच्या 80 पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. 10 हजार 712 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. पात्र उमेदवारांसाठी  7 जानेवारीला परीक्षा झाली होती. सुमारे आठ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती. प्रश्नपत्रिका खूप कठीण होती अशा प्रकारच्या तक्रारी त्यावेळी केल्या गेल्या होत्या.80 पदांमध्ये 43 पदे सर्वसामान्य गटासाठी, 21 पदे इतर मागासवर्गीय, 9 अनुसूचित जमातींसाठी, 2 अनुसूचित जाती तसेच दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिकांची मुले व माजी सैनिकांसाठी प्रत्येकी एक पद होते. एकही उमेदवार पात्र ठरला नसल्याने आता हा चर्चेचा विषय बनला आहे. परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास लागलेल्या  विलंबामुळे उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.