‘लिंग्वा फ्रँका’ ही एकाचवेळी रशियन, फिलिपिनो आणि अमेरिकन कथा-झेट टोलेंटीनो

0
813

चित्रपटांमध्ये प्रेक्षकांशी संवाद साधण्याची क्षमता असावी-रमाजान नानायेव

गोवा खबर:इफ्फीमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सर्व चित्रपटांमधले वैशिष्ठ सांगायचे तर या चित्रपटांच्या विषयांची विविधता आणि चित्रपट निर्मितीच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला बघायला मिळतात. 50 व्या इफ्फीमध्ये आज सात आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या दिग्दर्शक आणि कलावंतांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आपआपल्या चित्रपटांची माहिती दिली. त्यावेळी या विषयांमधले वैविध्य अधोरेखित झाले. ‘लिंग्वा फ्रँका’ चे निर्माते झेट टोलेंटीनो, ‘रोडस् टू ऑलिंपिया’ चित्रपटाचे दिग्दर्शक रमाजान नानायेव, ‘हेड बर्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सॅवेज सेविज, ‘पार्टीकल्स’ चित्रपटाच्या निर्मात्या इस्टेल फियालोन, ‘द फादर’ चित्रपटातले अभिनेते इवान बार्नेव्ह, ‘बलून’ चित्रपटातील अभिनेत्री यांशिक त्सो आणि ‘सायन्स ऑफ फिक्शन्स’ चित्रपटातले अभिनेते गुनवान मार्यांटो या सर्वांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

 

‘लिंग्वा फ्रँका’ चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय तृतीयपंथी व्यक्तीने केले आहे. या चित्रपटातील कथा एकाचवेळी रशियन, फिलिपिनो आणि अमेरिकन पार्श्वभूमीवी कथा आहे, असे निर्माते टोलेंटीनो यांनी सांगितले. अमेरिकेतल्या राजकीय पार्श्वभूमीवर तृतीयपंथी समुदायांच्या प्रश्नांविषयी ही बहुआयामी कथा गुंफण्यात आली आहे.

‘रोडस् टू ऑलिंपिया’ या चित्रपटाविषयी दिग्दर्शक रमाजान नानायेव यांनी माहिती दिली. तीन वेगळ्या देशांमध्ये क्रीडा क्षेत्रात होणाऱ्या सांस्कृतिक, लैंगिक आणि सामाजिक भेदभावाच्या विषयावर हा चित्रपट आधारलेला आहे. सत्य घटनेवर आधारीत असलेले हे कथानक रशियातल्या एका मित्राच्या आयुष्यावर बेतलेले आहे, असे त्यांनी सांगितले. चित्रपटांमध्ये प्रेक्षकांशी जोडून घेण्याची क्षमता असायला हवी, प्रेक्षकांना ते आपलेसे वाटले पाहिजे, असे नानायेव म्हणाले.

‘पार्टीकल्स’ हा ब्लासी हॅरिसन यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट विज्ञानावर आधारीत आहे. दिग्दर्शकाच्या स्वत:च्या अनुभवांवर याचे कथानक लिहिले आहे असे निर्मात्या इस्टेल फियालोन यांनी सांगितले.

‘द फादर’ या चित्रपटात दोन पिढ्यांमधल्या जनरेशन गॅपमुळे नात्यात निर्माण झालेल्या दुराव्याचा शोध घेण्यात आला आहे.

‘सायन्स ऑफ फिक्शन्स’ हा इंडोनेशियातल्या राजकीय पार्श्वभूमी आधारलेला चित्रपट आहे. या चित्रपटात आवाज उठवू न शकणाऱ्या मात्र सत्याच्या बाजूने उभे असलेल्या जनतेच्या प्रवासाची कहाणी देण्यात आली आहे.