लहानांसोबत मोठ्यांनीही आवर्जून वाचावा असा विशेषांक : दिवाळी २०१७ माऊस

0
1080
दिवाळी २०१७ माऊस
बालकुमारांमधलं वाचनवेड वाढावं, दर्जेदार साहित्याची संगत-गोडी मुलांना लागावी यासाठी गेली सहा वर्षं उत्साहाने चालू असलेला एका सकारात्मक उपक्रम म्हणजे ‘माऊस’.
भाषासमृद्धी हा मुलांच्या विकासाला हातभार लावणारा एक महत्त्वाचा घटक आहे. जर पाठ्यपुस्तकं आणि टीव्ही-इंटरनेटसारखंच अवांतर वाचनसाहित्यही मुलामुलींपर्यंत पोहोचलं तर समृद्ध भाषिक विकासाची शक्यता द्विगुणित होते. मुलांचं भावविश्व, अनुभवविश्व आणि विचारविश्व विस्तारायला त्याद्वारे मदत मिळते. त्यासाठीचाच एक खटाटोप म्हणजे गेली सहा वर्षं दिवाळीच्या निमित्ताने प्रकाशित होत असलेला ‘माऊस’ हा कुमारकथा विशेषांक.  
दर्जेदार साहित्यनिर्मिती करू पाहणाऱ्या लेखकांना मुलांसाठी लिहितं करणं आणि मराठीसारख्याच इतर भाषांमध्ये निर्माण होत असलेलं समृद्ध साहित्य अनुवादित स्वरूपात मुलांपर्यंत पोहोचवणं हे ‘माऊस’ला महत्त्वाचं वाटतं. फक्त शहरातल्याच नव्हे तर खेडोपाडीच्या आणि परिघावरच्या जास्तीत जास्त मुलामुलींपर्यंत दमदार साहित्यिकांचं कसदार लेखन पोहोचवणं ही ‘माऊस’ आपली जबाबदारी मानतो.
यंदाच्या ‘माऊस’ दिवाळीअंकात आहेत… दिलीप प्रभावळकर, माया पंडित, मुकुंद कुळे, अतुल सुलाखे, हिनाकौसर खान, प्रतिक पुरी, अजय कांडर, संजय भास्कर जोशी, सोनाली नवांगुळ, मेनका धुमाळे, अरुण मांडे, दिलीप बोरकर आणि अनंत भावे यांनी लिहिलेल्या/अनुवादित केलेल्या कसदार कुमारकथा. या अंकासाठी खासमखास मुखपृष्ठ दिलंय प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी. त्यांनी या अंकाच्या मुखपृष्ठासाठी दिलेलं चित्र म्हणजे निव्वळ पाहात राहावं इतकं अप्रतिम!
यंदाचा ‘माऊस’ हा अंक आहे १०४ पानांचा आणि त्याची किंमत आहे १०० रुपये. यंदाच्या दिवाळीत विकत घ्यावा, वाचावा, नक्की कुणा व्यक्तीला किंवा वाचनालयाला अक्षरभेट म्हणून द्यावा असा हा अंक आता पणजीतल्या, सावंतवाडी, कणकवलीतल्या तसंच मुंबईतल्या प्रमुख पुस्तक दुकानात विक्रीसाठी  उपलब्ध आहे. लवकरच तो कोल्हापूर आणि पुण्यातही उपलब्ध होईल.     

 
अमृता वाळिंबे (संपादक व प्रकाशक, ‘माऊस’)

संपर्क
अमृता वाळिंबे
फोन- ९७ ६७ ५८ ५७ ०७, ९४२०६ १५३१५