पर्रीकरांच्या स्वप्नातील  गोवा घडविण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या: मुख्यमंत्री

0
694

गोवा खबर:माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्वप्नातील  गोवा घडविण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन भाईंना  श्रद्धांजली द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हरमल गणेशोत्सव सभागृहात बुथ कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले.

पर्रीकर यांच्या शब्दास मान देत सोपटे यांनी भाजपात प्रवेश केला तो केवळ स्वार्थासाठी नव्हता. पर्रीकरांसारखे नेतृत्त्वच गोव्याचा कायापालट करू शकते व त्यामुळे सरकार पक्षात येऊन मतदारसंघातील समस्या, साधनसुविधा, वीज, पाणीटंचाई समस्या मार्गी लावण्यासाठी सोपटे यांनी निर्णय घेतला तो योग्यच होता, हे आजच्या उपस्थितीवरून दिसून येते, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

मांदे मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. तो पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने जबाबदारीने काम करण्याची गरज आहे.  पेडणे तालुक्यासाठी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ, इलेक्ट्रॉनिक सिटी व एम्सच्या धर्तीवर आयुष रिसर्च हॉस्पिटल सारखे प्रकल्प येणार आहेत. अधिकाधिक रोजगार संधी या तालुक्यातील युवकांना मिळेल याची खात्री आहे. विमानतळासाठी लागणारे मनुष्यबळ व त्याचे कौशल्य प्रशिक्षण वर्ग जूनपासून सुरू होणार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

भाजपने ध्येय बाळगून समाजकारणात भाग घेतला व त्यातून राजकारण व समाज घटकांसाठी जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केला. विकासगंगा दारोदारी आणली. त्यांचा फायदा तळागाळातील सर्वसामान्यांना दिला व यापुढे देण्यासाठी भाजपास मतदान करावे, असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले.

मांद्रेच्या सर्वागीण विकासासाठी भाजपात प्रवेश केला. याचा फायदा तुंबडी भरण्यासाठी केला नाही. सग्या सोयऱयांना नोकरीचा लाभ दिला नाही तर मांद्रेतील बेरोजगार युवकांसाठी तसेच साधन सुविधांसाठी भाजपात प्रवेश केला. मोपा विमानतळ इलेक्ट्रॉनिक सिटी, पाणी प्रकल्प, वीजप्रकल्प मार्गी लावण्याचे  आपण प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आपणांस पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन सोपटे यांनी केले.