रोजगार निर्मिती आणि महसूल निर्मितीच्या क्षमतेमुळे भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र अतिशय महत्वाचे 

0
3275

विसाव्या फिक्की फ्रेमची मुंबईत सुरुवात

 

गोवा खबर:भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र लाखो रोजगार निर्माण करण्याबरोबरच लक्षणीय महसूलही निर्माण करत असून त्याची अतिशय वेगाने वृद्धी होत असल्याने माहिती आणि प्रसारण क्षेत्र अतिशय महत्वाचे असल्याचे माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी म्हटले आहे. यामध्ये सरकारची भूमिका सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्याची आहे, नियमकाची नव्हे असे ते म्हणाले. विसाव्या फिक्की फ्रेम 2019 च्या उद्‌घाटनपर सत्रात ते आज बोलत होते. तीन दिवसांची ही परिषद आजपासून मुंबईत सुरु झाली आहे. फ्रेम्स @ 20 : ग्लोबल गोज इंडिया ही या परिषदेची संकल्पना आहे.

 

प्रसारण क्षेत्राविषयी बोलतांना, अधिक नियमनापेक्षा कमी नियमन उत्तम आणि सरकारकडून नियमनापेक्षा आत्मनियमन अधिक उत्तम असे खरे म्हणाले. नियमन हे स्पष्ट आणि निसंदिग्ध असेल तर कमी नियमन आणि आत्मनियमन हे परस्पर पूरक आहे.

भारतात धोरणे आणि नियमन हे मंचावरुन विकसित केले आहे. आशय किंवा मजकुरानुसार नव्हे असे त्यांनी स्पष्ट केले. 2019 मधे मंच अभिसरण होत असून काही धोरणांचा पुनर्विचार आणि फेररचना आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या उद्योगाच्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याची क्षमता जाणून घेण्यासाठी या क्षेत्राला महत्व देणे आवश्यक असून त्या दृष्टीने अनेक पावले उचलली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्राशी संबंधितांमध्ये आणि या क्षेत्रात रुची असणाऱ्यांमध्ये संवाद घडविण्याच्या दृष्टीने फिक्की फ्रेम्स सारखा मंच अतिशय उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातल्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगावरच्या फिक्की-ई वाय नॉलेज पेपर आणि सायरिल अमरचंद मंगलदास लॉ बुकचे सचिव आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राची आगेकूच व्हावी यासाठी अधिक उद्योजक, संस्थापक आणि नेतृत्वाची गरज ‘Up Grad’ चे अध्यक्ष आणि सहसंस्थापक रोनी स्क्रूवाला यांनी अधोरेखित केली. भविष्यातल्या माध्यम कंपन्या या माध्यम कंपन्या नव्हे तर ग्राहकांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलेल्या ग्राहक केंद्री कंपन्या असतील असे ते म्हणाले. या उद्योगासाठी अधिक नाविन्यतेची गरजही त्यांनी व्यक्त केली.

कथांमधे प्रेरणा देण्याची जागतिक ताकद असते असे सांगून कथा कथनाची ही शक्ती उपयोगात आणून हे उद्योग क्षेत्र भारताच्या युवा पिढीला जगात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकते असे नॅशनल जिओग्राफिक पार्टनरचे मुख्य कार्यकारी अधिकारी गॅरीनेल यांनी सांगितले.

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी मनोरंजन उद्योगाचे आपण मोठे चाहते असल्याचे मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिकेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चार्लस्‌ एच रिव्हकीन म्हणाले.

माध्मम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी भारत हे एक औत्सुक्यपूर्ण बाजारपेठ असल्याचे फिक्कीचे उपाध्यक्ष उदय शंकर यांनी सांगितले. राष्ट्रीय आकांक्षाची पूर्तता करण्यात हे क्षेत्र कदाचित इतर क्षेत्रांपेक्षा महत्वाची भूमिका बजावेल यावर त्यांनी भर दिला.