रोजगार निर्मितीत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल – सुरेश प्रभू

0
957

 

 

नवी दिल्ली:सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र रोजगार निर्मितीत महत्वाची भूमिका बजावेल आणि रोजगाररहित विकासाला आळा घालेल असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे. नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय लघु, मध्यम उद्योग परिषद 2018 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते आज बोलत होते.

जागतिक विकासाला चालना देण्यासाठी जगभरात चर्चा सुरु आहेत मात्र देशातली गरीब आणि श्रीमंत तसंच गरीब आणि श्रीमंत देशातली वाढती दरी, हवामान बदल, रोजगाररहित विकास अशी अनेक आव्हाने समोर असल्याचे प्रभू म्हणाले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र या आव्हानांवर मात करण्यामधे महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे समावेशक विकासाचे दूत असल्याने हे क्षेत्र गरीब आणि श्रीमंत यातली दरी कमी करेल, असे त्यांनी सांगितले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या भूमिकेवर भर देत, नवे औद्योगिक धोरण लवकरच जाहीर होणार असून, त्यामधे स्वयंसहायता गटांच्या भूमिकेवर मोठा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोठे उद्योग आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र यांच्यातला दुवा बळकट करणे ही काळाची गरज आहे ही दोन्ही उद्योग क्षेत्रे मिळून जागतिक अर्थव्यवस्थेची भरभराट होईल, असे प्रभू म्हणाले.