रेल्वे चालकाने इमर्जन्सी ब्रेक दाबून वाचवले शेकडो प्रवाशांचे प्राण

0
1086
गोवा खबर:दक्षिण गोव्यातील कामराळ येथे गुरुवारी सायंकाळी कुळे येथे जाणारी लोकल ट्रेन  अपघातातून बालंबाल बचावली. ही ट्रेन कुडचडे रेल्वे स्थानकावरून कुळेच्या दिशेने जात असताना कामराळ येथे अचानक माड आणि वडाचे झाड उन्मळून रेल्वे रुळावर पडले.मात्र  चालकाने प्रसंगावधान दाखवून आपत्कालीन ब्रेक लावल्याने मोठा अपघात टळला.
मडगाव ते कुळे मार्गावर धावणारी लोकल ट्रेन सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुडचडे रेल्वे स्थानकावरून कुळेच्या दिशेने निघाली होती. यावेळी सुमारे पाचशे प्रवासी रेल्वेतून प्रवास करत होते.त्याचवेळी कामराळ येथे साईनाथ मंदिरासमोर जुने वडाचे झाड आणि माड एकाचवेळी उन्मळून पडले. दोन्ही झाडांचा अधिकांश भाग रेल्वे रूळावर कोसळला. अंधार असल्याने  वेगात येणार्‍या रेल्वे चालकाला प्रथम ही झाडे दिसली नाहीत. पण स्थानिक महिलांनी तातडीने रेल्वे रुळावर धाव घेऊन रेल्वेसमोर लाल कपडा धरल्याने पुढे काहीतरी धोका आहे, हे चालकाच्या लक्षात आले. पडलेल्या झाडांपासून अवघ्या तीस मीटर अंतरावर रेल्वे चालकाने आपत्कालीन ब्रेक लावल्याने रेल्वे बालंबाल बचावली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
नगराध्यक्ष फेलिक्स फेर्नांडिस यांना रूळावर झाडे पडण्याचा प्रकार समजताच त्यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला.  अग्निशमन दलाने रूळावर पडलेली झाडे बाजूला केल्यानंतर सुमारे पाऊण तासा नंतर रेल्वे कुळेसाठी रवाना झाली. दोन्ही झाडे पडल्याने कामराळ येथील अंतर्गत रस्ता देखील बंद झाला होता.